मोदी जन्माने ओबीसी असते, तर पंतप्रधान झाले असते का?- मायावती
   दिनांक :11-May-2019
 
 लखनौ: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे. त्या पृष्ठभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू आहेत. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. मोदी राजकीय स्वार्थासाठी ओबीसी असल्याचा दावा करतात. मोदी जन्माने ओबीसी असते तर त्यांना पंतप्रधान करण्यात आले असते का? असा प्रश्न मायावतींनी ट्विटद्वारे केला आहे.
 

 
 
मायावतींनी दोन ट्विट करून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. महाआघाडी जातीयवादी असल्याची टीका मोदींनी केली होती. त्या टीकेला मायावतींनी पहिल्या ट्विटमधून उत्तर दिलं. ‘मोदींनी महाआघाडीवर केलेला जातीयवादाचा आरोप हास्यास्पद आणि अपरिपक्व आहे. जातीयवादाचा अभिशाप असलेले पीडित जातीयवादी कसे काय असू शकतात? मोदी जन्माने ओबीसी नसल्याने त्यांना जातीयवादाचा दंश सहन करावा लागलेला नाही. त्यामुळेच ते अशी विधाने करतात,’ अशी टीका मायावतींनी केली आहे.
पंतप्रधान मोदी राजकीय स्वार्थासाठी स्वत:ला मागासवर्गीय म्हणवतात, असा आरोप मायावतींनी केला. मोदी स्वत:ला राजकीय लाभासाठी ओबीसी म्हणतात. मोदी जर खरेच जन्माने मागास असते, तर त्यांना कधी पंतप्रधान होऊ दिले असते का? असा सवाल त्यांनी दुसर्‍या ट्विटमधून उपस्थित केला आहे. मायावतींनी कल्याण सिंह यांचा उल्लेख करत निशाणा साधला. कल्याण िंसह मागासवर्गीय असल्यानेच त्यांना बाजूला सारले गेले, असा आरोप करत मायावतींनी शरसंधान साधले.