अमेरिकेने ताब्यात घेतले उत्तर कोरियाचे व्यापारी जहाज

    दिनांक :11-May-2019
- तणाव वाढला
 
वॉशिंग्टन,
 
उत्तर कोरियाच्या जहाजाने आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत अमेरिकेने ते ताब्यात घेतले आहे. दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण असताना ही पहिलीच ठोस कारवाई करण्यात आली आहे.
 
उत्तर कोरियाचे दुसर्‍या क्रमांकाचे जहाज ‘दी वाईज ऑनेस्ट’ अमेरिकेने एप्रिल 2018 मध्ये इंडोनेशियात थांबले असताना ताब्यात घेतले आहे. ते आता अमेरिकन समोआ येथे नेले जाणार आहे.
 
 

 
 
अमेरिकेच्या न्याय खात्याच्या अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. उत्तर कोरियाने दोन लघुपल्ल्याची क्षेपणास्त्रे डागल्यानंतर अमेरिकेने या कारवाईची घोषणा केली आहे. पाच दिवसांत उत्तर कोरियाने दोनदा क्षेपणास्त्र चाचणी केली असून, अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यात अण्वस्त्र निर्मूलनाबाबतच्या वाटाघाटी फिसकटत असताना, त्यात या कारवाईची आणखी भर पडली आहे.
न्याय खात्याच्या वकिलांनी सांगितले की, न्यू यॉर्कमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे उत्तर कोरियाचे व्यापारी जहाज जप्त करण्यात आले आहे. या जहाजाच्या निगा व दुरुस्तीचा खर्च हा अमेरिकी अर्थ संस्थांच्या माध्यमातून होत होता आणि हे अमेरिकी कायद्याचे उल्लंघन आहे.
 
सहायक महाधिवक्ता जॉन डेमर्स यांनी सांगितले की, सध्या हे जहाज वापरात नाही. आताच्या क्षेपणास्त्र चाचणीशी त्याचा काहीही संबंध नाही. याबाबतची तक्रार आधीच दाखल झाली होती. 581 फूट लांबीचे ‘वाईज ऑनेस्ट’ जहाज हे उत्तर कोरियाचा कोळसा चीन, रशियाला पुरवण्यासाठी वापरले जात होते. त्यातून मोठा महसूल मिळत होता. उत्तर कोरियाच्या या जहाजाला इंडोनेशियाच्या अधिकार्‍यांनी रोखले होते व नंतर पूर्व चीन सागरात महिनाभरापूर्वी ते जप्त करण्यात आले होते. उत्तर कोरियातील नाम्पो बंदरावर जहाजात कोळसा भरतानाचे छायाचित्रही घेण्यात आले होते.