मतदान केंद्रातील अनुभव...

    दिनांक :12-May-2019
मृणाल मंगेश भगत/दुर्गे
8007352221
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. नुकतेच तिसर्‍या टप्प्यातीलही मतदान पूर्ण झालेले आहे आणि प्रतीक्षा आहे ती निकालाची. या निवडणुकीतील एक खास वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी प्रत्येक मतदान यंत्रासोबत (इव्हीएम) व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल) मशीन जोडण्यात आले होते. उमेदवाराला दिलेले मत त्या मशीनमध्ये नोंदले जाऊन मतदार, आपण कुणाला मत दिले आहे हे त्यातील पेपरवर बघू शकतो. या निवडणुकीसाठी 16 लाख व्हीव्हीपॅट मशिन्स, 3174 कोटी रुपये खर्च करून निवडणूक आयोगाने विकत घेतल्या आहेत. मतदारांना या व्हीव्हीपॅट मशीनबद्दल फार उत्सुकताही होती. अनेक मतदारांनी विचारलेसुद्धा की, हीच ती व्हीव्हीपॅट मशीन आहे का? फारच छान! त्यामुळे आपले मत कुणाला दिले हे लक्षात येते, अशा प्रतिक्रियाही आल्या.
 
 
 
परंतु, गावातील मतदारांना व्हीव्हीपॅटची काहीच माहिती नसल्यामुळे, निवडणूक अधिकार्‍यांना समजावून सांगावे लागत होते. आतापर्यंत मतदान यंत्राचे (इव्हीएम) बटन दाबले की लगेच बीप असा आवाज यायचा त्यामुळे आपले मतदान झाले, हे लगेच कळत असे. परंतु, यावेळेस व्हीव्हीपॅटची स्लिप येईपर्यंत सात सेकंद लागायचे, त्यामुळे मतदारांना शंका यायची की मतदान झाले की नाही. सात सेकंदपर्यंत धीर कुठला?
 
‘‘मॅडम, झालं काजी माह्यं मतदान, आवाज तं आलाच नाही जी.’’ त्यांना सांगावं लागायचं की थांबा थोडं, त्या नवीन मोठ्या मशीनमध्ये बघा, चिठ्ठी पडतेयना! त्यानंतर बीप झाला की त्यांचे समाधान व्हायचे.
 
एक-दोन मतदारांनी तर बटनऐवजी उमेदवाराच्या चिन्हालाच दाबलं, तीन मिनिटंं होऊनही मशीनमधून बीप येत नव्हता. त्या स्त्रीला विचारण्यात आल्यावर तिने सांगितले की, ‘‘हो जी मॅडम, म्या तं बटन दाबलं, पण आवाज तं नाय आला, थे चिन्ह नाय का थे चं दाबलं जी.’’ तेव्हा तेथील अधिकार्‍यांनी त्यांना समजावून सांगितले की, चिन्हासमोर जे बटन आहे ते दाबावे लागते.
कुणाचे नावच मतदार यादीत नाही, तर कुणाचे नाव बदललेले. कुणी मतदार आक्षेप घेत होते, तर कुणाला प्रथम वेळेस मतदान केल्याचा आनंद. ‘‘मॅडम, अशी मोठ्ठी शाई लावा जी, दिसलं पाह्यजे ना, का म्या या वर्षी पहिल्यांदा मतदान केलं म्हणून.’’
 
व्हीव्हीपॅट मशीन या वर्षी निवडणुकीतील मतदारांसाठी उत्सुकतेचा विषय होती. अनेकांना ते मशीन बघायचे होते. गावातील मतदार शिस्तबद्धतेने रांगेने मतदान करीत होते आणि निवडणूक अधिकारीही नियोजित कार्य पार पाडत होते...