‘यती’च्या निमित्ताने मोदी व लष्कराला विरोध...
   दिनांक :12-May-2019
तरुण विजय  
भारतीयांच्या आस्था, निष्ठा व श्रद्धास्थानांवर आघात करण्याची एकही संधी, तिरस्कार आणि द्वेषाने अंध झालेली स्वयंघोषित सेक्युलर नाझी मंडळी सोडत नाहीत. भारतीय लष्कराच्या एका तुकडीने हिमालयातील बर्फाच्छादित उंच पर्वतराजींमध्ये यतीची पावले पाहिली आणि त्याविषयी माध्यमांना माहिती दिली. मात्र, ही संधी साधून या स्वयंघोषित सेक्युलॅरिस्टांनी लष्कराची खिल्ली उडविली व या निमित्ताने मोदींवर हल्ला चढविण्याची संधीही या तथाकथित पुरोगामी लोकांनी सोडली नाही. यहुदींची कत्तल केल्यानंतर हिटलरला जसा (विकृत) आनंद व समाधान मिळत होते, अगदी तसाच आनंद स्वयंघोषित पुरोगामी सेक्युलॅरिस्टांना मोदींवर प्रहार केल्यानंतर होतो. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना किंवा माओवादी अथवा जिहादींच्या रक्तरंजित हिंसाचाराचा निषेध करताना आम्ही या सेक्युलर लोकांना कधीच पाहिले नाही. महाराष्ट्रापासून छत्तीसगडपर्यंत कम्युनिस्ट दहशतवादी, सुरक्षा जवान आणि सर्वसामान्य नागरिकांची हत्या करीत आहेत. मात्र, स्वयंघोषित सेक्युलर मीडिया आणि नेते मात्र नक्षलवादी हे गरिबांच्या हक्काची लढाई लढणारे क्रांतिकारक असल्याचे सांगत आहेत.
 
‘तुकडे तुकडे गँग’ला किंवा जंतरमंतरवर रोज समूहाने नारेबाजी करणार्‍या ‘वाणी वीरां’ना आम्ही कधीच पुलवामा हल्ल्यातील जिहादी गुन्हेगारांचा निषेध केलेले किंवा ईशान्य भारतातील फुटीरवाद्यांविरुद्ध आंदोलन करताना पाहिलेले नाही. एवढेच कशाला, लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद अथवा जहाल आसिया अंद्राबीच्या धर्मांध आणि जिहादी कारवायांविरुद्ध या सेक्युलॅरिस्टांनी कधी तोंडातून ‘ब्र’देखील काढलेला आम्ही पाहिलेला नाही. वर्तमानपत्रात त्यांच्याविरुद्ध एक ओळही छापलेली आम्ही कधी पाहिलेली नाही. मात्र, या तिरंग्याच्या व संविधानाच्या सन्मानासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या भारतीय जवानांविरुद्ध बोलताना या पुरोगाम्यांना चांगलाच कंठ फुटतो. आतापर्यंत या सेक्युलर बुद्धिजीवींनी सर्व महत्त्वाच्या सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक संस्थांवर ताबा मिळविला होता. कॉंग्रेसी सत्ताधार्‍यांच्या आश्रयाने सरकारी अनुदान, शिष्यवृत्तीवर डल्ला मारला. केवळ उजव्या विचारसरणीचे किंवा राष्ट्रवादी विचारांचे आहेत, या एकमेव कारणासाठी अशा संस्थांमध्ये कार्यरत सर्वसामान्य कर्मचार्‍याचा मानसिक छळ केला जायचा. 

 
 
नुरुल हसनपासून अर्जुनसिंह यांच्यापर्यंत असेच सुरू होते. यांच्या ‘विशेषाधिकार’ असलेल्या ‘टोळीत’ सहभागी व्हायचे असल्यास तुम्हाला रोमिला थापर किंवा इरफान हबीब यांची पुस्तके, ग्रंथ वाचणे क्रमप्राप्त होते. सहमत असो किंवा नसो हिंदुत्ववाद्यांविरुद्ध लिहिणे, बोलणे ही महत्त्वाची अट होती. तरच पुरोगाम्यांच्या कंपूत तुम्हाला प्रवेश मिळेल, अशी ही व्यवस्था होती. हिंदुत्ववाद्यांवर केवळ तोंडी टीकाच नव्हे, तर वर्तमानपत्रातील अग्रलेखांच्या माध्यमातून त्यांच्यावर गरळ ओकणे आणि वामपंथी विचारधारा लादणे, हा एकमेव कार्यक्रम या सेक्युलर व डाव्या लेखकांनी हाती घेतला होता. खरेतर भारतात डावी विचारसरणी पार निष्प्रभ ठरली आहे, डाव्यांचा प्रभाव संपुष्टात आला आहे, येथे त्यांना कुणीच विचारत नाही. पण, तरीही राष्ट्रवाद्यांना कायम विरोध करणे, त्यांच्या श्रद्धा, परंपरा व मूल्यांवर आघात करणे, हे डाव्यांचे उद्योग अद्यापही बंद झालेले नाहीत. उलट ते वाढत आहेत. खरेतर हिंदुत्वाला मानणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, संपूर्ण भारतात राष्ट्रवाद्यांना व्यापक जनसमर्थन मिळत आहे. उजव्या विचारवंतांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ वाचणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही या डाव्यांनी हे सत्य स्वीकारलेले नाही, त्यांचा हिंदुत्ववाद्यांना आंधळा विरोध सुरूच आहे. असा वैचारिक दहशतवाद सोव्हिएट रशिया अथवा चीनमध्ये असता, तर एकवेळ समजण्यासारखे होते. मात्र, लोकशाही असलेल्या भारतात, लोकशाहीचाच आश्रय घेऊन भिन्न विचारसरणी असलेल्यांची मुस्कटदाबी करणे, ही सेक्युलर दहशतवादाची भारतीय आवृत्तीच म्हणावी लागेल!
 
लष्कराच्या एका पर्वतारोही तुकडीतील जवानांनी आपल्या व्यापक शोधमोहिमेंतर्गत बर्फावर 31द 15 इंच पावलांचे ठसे उमटलेले पाहिले. त्यामुळे स्वाभाविकच त्यांनी जे पाहिले ते वैज्ञानिकांच्या चमूला स्पष्टपणे सांगितले आणि ही पदचिन्हे यतीची असू शकतात काय, असा प्रश्न या वैज्ञानिकांना विचारला. यात खरेतर वावगे असे काहीच नव्हते. यती या विषयावर महाविद्यालयात असल्यापासून मी अभ्यास करीत आहे. तिबेटच्या गव्हर्नरची संमती घेऊन मी दोन वेळेला दक्षिण-पश्चिम तिबेट क्षेत्रातील जगातील महान चमत्कारी बौद्ध योगी मिलारेप्पाच्या गुहेपर्यंत जाऊन आलो आणि तेथे पांढरा तारा, निळा तारा आणि डाकिणी देवी व यतींच्या संदर्भात असलेल्या श्रद्धा, विश्वास आणि कथांचा संग्रह केला. यती या विषयावर भरपूर प्रमाणात पुस्तके, ग्रंथ उपलब्ध आहेत. कलिमपोंगमध्ये 40 व 50 च्या दशकात तेथील वर्तमानपत्रात यतीच्या संदर्भात अनेक लेख प्रकाशित झाले. यतीचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याचेही अनेकांनी लेखात म्हटले आहे.
 
1960 मध्ये एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलेरीने कवटीच्या साहाय्याने प्रत्यक्ष यतीचा शोध घेण्याचे अभियान हाती घेतले होते आणि नंतर ती कवटी लंडन येथे नेऊन त्याचे वैज्ञानिक दृष्टीने परीक्षण केले होते. कलिमपोंग येथून 8 आणि 15 फेब्रुवारी 1959 रोजी हिमालयन टाइम्स या वृत्तपत्रात, यतीकडे राहून आलेल्या किंवा यतीने गावातून पळवून नेलेल्या लोकांचे अनुभव प्रथमच प्रकाशित झाले. बहुतांश लेख इंग्लंड आणि अमेरिकेत राहणार्‍या आणि पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या प्रवाशांनीच लिहिले होते. इजविस्तिया या रशियन वर्तमानपत्राने नेपाळ-तिबेट सीमेवर मोहीम राबविणार्‍या टॉम सलिक याच्यावर तो अमेरिकेचा हेर असल्याचा आरोपही केला होता. टॉम यतीच्या माध्यमातून हेरगिरी करीत असल्याचे या वर्तमानपत्राचे म्हणणे होते. या संदर्भातील लेख 12 मे 1957 च्या हिमालयन टाइम्समध्ये प्रकाशित झाला होता. यती अभियानाच्या निमित्ताने हेरगिरीचे एवढे मोठ्या प्रमाणात आरोप झाले की, जून 1957 मध्ये नेपाळ सरकारने यती अभियानासंदर्भात एक विस्तृत आचारसंहिता, नियमावलीच आखून दिली. 1960 मध्ये सर एडमंड हिलेरीने नारायण हेट्टी महालात तत्कालीन महाराज राजा महेंद्र वीर विक्रम शाह देव यांना यतीचे शिर भेट म्हणून दिल्याचेही वर्तमानपत्रात छापून आले होते. 11 डिसेंबर 1960 रोजीच्या हिंदुस्थान टाइम्समध्ये तसेच स्विस, जर्मन आणि स्थानिक शेर्पांच्या हजारो वृत्तान्तांमध्येही यतीचे वर्णन आढळून येते.
 
मात्र, भारतीय लष्कराच्या पर्वतारोही दलाने यतीच्या अस्तित्वाविषयी सांगितल्यावर येथील स्वयंघोषित सेक्युलर पत्रकारांनी चीनच्या त्या वर्तमानपत्रांचा दाखला दिला, ज्यात भारतीय लष्कराची टिंगलटवाळी करण्यात आली होती. हे सेक्युलॅरिस्ट भारतात राहतात, येथील अन्न खातात, पण चिनी वर्तमानपत्रांनी जर भारतीय सेनेवर चुकीची टिप्पणी केली तर ते या चिनी वर्तमानपत्रांची तळी अशा पद्धतीने उचलून धरतात की, जणू तो परमेश्वराचा प्रसाद आहे! यतीच्या निमित्ताने या सेक्युलॅरिस्टांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि लष्करावर प्रखर टीका करणे सुरू केले. एका सेक्युलर मुखंडाने लिहिले, मोदी यतीचे मंदिर उभारतील, तर ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की, भारतीय लष्कर अशा प्रकारच्या अफवा पसरवीत आहे, असे तारे आणखी एकाने आपल्या लेखातून तोडले. तर तिसर्‍याने लिहिले की, भारतीय लष्कराला विज्ञानातील नवीन शोधांविषयी कुठलीही माहिती नसते.
 
भारतीय लष्कराने शत्रूच्या घरात घुसून हल्ला केला, तर त्याविषयी शंका घेतली जाते. लष्कराने कुठली विशेष शोधमोहीम राबविल्यास तो टिंगलटवाळीचा, चेष्टेचा विषय ठरतो आणि लष्कराच्या निमित्ताने पंतप्रधानांवर गलिच्छ आणि व्यर्थ शेरेबाजी केली जाते. मोदी यांनी सेक्युलर व वामपंथी लोकांचे वर्चस्व साफ मोडून काढले, त्यांची दुकानदारी पार संपुष्टात आणली, त्यामुळेच या स्वयंघोषित पुरोगामी सेक्युलरांचा मोदींविरुद्ध थयथयाट सुरू आहे. मोदी आणि लष्कराविषयी शंका उपस्थित करून आणि त्यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. विदेशी विचारसरणीचे दास असलेल्या लोकांची ही बचावासाठी शेवटची धडपड सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आक्रमकतेचा आव आणला आहे. मात्र, ही सेक्युलर, डावी वाळवी पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय मोदींनी आता स्वस्थ बसू नये आणि पृथ्वीराज चौहानासारखी दया त्यांच्यावर मुळीच दाखवू नये, हीच अपेक्षा आहे...