तालिबानच्या तावडीतून 10 नागरिकांची सुटका

    दिनांक :12-May-2019
तभा ऑनलाईन,  
अफगाण सैन्याने तालिबानच्या तुरुंगामध्ये बंदिस्त असलेल्या १० नागरिकांची सुटका केली आहे. शुक्रवारी केलेल्या धडक मोहिमेमध्ये अफगाण सैन्याने उत्तरेकडील कुंडुझ प्रांतातल्या तुरुंगातून या नागरिकांची सुटका केली. चेहार दारा जिल्ह्यातील अक सराय या गावावर सैन्याने ही धडक कारवाई केली होती. तुरुंग म्हणून तालिबान्यांकडून वापरण्यात येत असलेली इमारत लष्कराच्या या कारवाईदरम्यान पूर्णपणे उद्‌ध्वस्त करण्यात आली. लष्कराचा प्रवक्‍ता गुलाम हझरत कारिमी यांनी ही माहिती दिल्याचे शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या बातमीमध्ये म्हटले आहे. 

 
लष्कराने या तुरुंगावर हल्ला करण्यापूर्वीच तेथील तालिबानी दहशतवादी पळून गेले होते. या तुरुंगात बंद असलेल्या नागरिकांना लष्कराच्या छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. तेथे त्यांची ओळख निश्‍चित केली जात आहे.त्यानंतर या नागरिकांच्या रहाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या नागरिकांची त्यांच्या नातेवाईकांशीही लवकरच भेट घडवून आणली जाणार आहे. हेरगिरीच्य्च्या आरोपाखाली गावांमधील नागरिकांचे अधून मधून अपहरण केले जाते.