हे जीवन सुंदर आहे !
   दिनांक :12-May-2019
जीवनरंग
मो. बा. देशपांडे
9850599307
 
हे जीवन सुंदर आहे! वाह! दर्शनी भागात किती अप्रतिम शीर्षक आणि त्याखाली चला-नव-जीवनाकडे वळू या! उषःकाले नवजीवनम! हे भावगर्भ प्रेरक ब्रीदवाक्य.. किती कलात्मकतेने कोरलंय्‌ बघा तरी! नव्या वास्तूवरील हे नूतन नाव बघून जो तो तोंड भरून स्तुती करीत होता. रंगराज आर्ट्सचा कलाकार रतन रणदिवे याने स्वयंप्रेरणेने हे सुंदर नामशिल्प स्वतः खपून, जीव लावून, अर्जंट म्हणून सहयोगाच्या भावनेतून, रात्रीचा दिवस करून कोरले होते. त्याला कारणही तसेच होते म्हणा!
 
पूर्वीपासून फावल्या वेळात मनोहरराव माने मोफत समुपदेशन करीत. समुपदेशन म्हणजे काय? कधी आकस्मिक समस्या उद्भवल्यास सामान्य माणूस पार हबकून जातो. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, त्या समस्या निवारणास्तव उपलब्ध सर्व पर्याय आणि उचित-मार्गदर्शन करणे हे या समुपदेशनात अभिप्रेत होते कारण वित्तसहाय्य आणि सामुग्रीचा पुरवठा करणारे अनेक असले तरी बहुदा सुयोग्य समुपदेशनाच्या अभावी जनसामान्यांची होणारी दिशाभूल त्यांना नेहमीच अस्वस्थ करीत असे. नियोजन आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाच्या अभावी मोठ्या योजनाही रसातळाला जाऊ शकतात, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. जगात निव्वळ सामुग्री-व्यवस्था आणि संसाधने असून भागात नाही तर योग्य सन्मार्गी, सकारात्मक समुपदेशन हे वंगणासारखे काम करते, तर नेमकी त्याचीच वानवा का असावी? 

 
 
समुपदेशन हे समाजबांधणी सुसंगठीत करणारे हे एक व्यापक क्षेत्र असून त्याला कोणताही विषय वर्ज्य नाही. कुलपाला किल्ली असते. तद्वत प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर असतेच असते आणि ते योग्य वेळी मिळतेच मिळते. बहुदा संयमाने शोधावे लागते. किशोरवयिनांच्या समस्या, जीवनाच्या चाकोरीला खीळ बसलेल्यांच्या समस्या, महिला-बाल कल्याण, वृद्धांच्या समस्या, निराधारांच्या समस्या कुणाला विवाहपूर्व तर कुणाला कुणाला विवाहोत्तर समस्या असतात. कुणाला संतती हवी असते तर कुणाला संततीनियमन हवे असते. कुणाची केस सुटायची असते. कुणाला ऋणमुक्ती हवी असते. कुणाला करसवलत तर गृहकर्ज हवे असते. कुणाला वैद्यकीय सल्ला तर कुणाला कायद्याचा सल्ला हवा असतो. कुणाच्या शरीरात गाठ असते. कुणाच्या मनात गाठ असते.
 
बेबनाव झालेल्या आणि स्वभावाच्या अडथळ्यावर अडलेल्या दाम्पत्यांच्या डिरेल जीवनगाडीला रुळावर आणण्याचा प्रयत्न करणे तर कुणाचे शारीरिक तक्रारीमुळे मनःस्वास्थ्य कोलमडते तर कुणाला मनोशारीरिक व्याधी जडतात. कुणाचे कज्जे, कुणाचे हिश्शेवाटे तुंबलेले असतात. पर्यायाने यातून पुढे वाद-विवाद, दंगे-धोपे, लाचलुचपत, चोरीचपाटी, छिनाझपटी, मारामारी, तोडमरोड असे एक ना दोन असलं काहीतरी अप्रिय घडू शकतं , ही शक्यता ध्यानात घेऊन हा बिनभांडवलाचा व्यवसाय एक सामाजिक-कार्य म्हणून स्वीकारला होता. अनेक समस्या अशा असतात, ज्या केवळ दुर्लक्षित असतात म्हणून अनुत्तरीत असतात हेही तितकेच खरे! पण नवजीवनारंभ कधीही करता येतो. त्यासाठी विशिष्ट तारीख, मुहूर्ताची गरज नसते. केवळ सदिच्छेचा निग्रह हवा.
 
कोणत्याही चांगल्या कामाची निव्वळ सुरुवात करायची देर, मग अनेक चांगले हात पुढे येतात, हेही नैसर्गिक सत्यच! याचा या निमिताने पुरेपूर प्रत्यय येत होता. अनेक सेवाभावी व्यावसायिक मनोहररावांच्या या कार्यात आपले विनामूल्य योगदान देण्यातून जुळलेले होते. मनोहररावांचे एक निवृत्त सहकारी गजानन म्हात्रे हे या कार्यात मनोभावे निरपेक्ष सक्रिय सहभाग आजवर दर्शवित आले होते. भावनिक आणि वैद्यकीय आधारासाठी एक चमू सज्ज होती. तसेच आर्थिक आधारासाठीही काही स्वयंसेवी संस्थांचे फिल्डिंग होते.. लाभान्वित झालेले लोकं स्वतःहून यथाशक्ती आर्थिक योगदान देत, त्या भरोशावर हा मोफत उपक्रम सु होता. एकूणच उपक्रम लोकोपयोगी आणि आदर्श होता. आजवर ही मोहीम मनोहरराव वेळ निळेल तशी अखंड राबवित आले होते. अनेक लाभार्थी असल्याने त्यामुळे लोकसंग्रह अमाप झाला होता. आता निवृत्तीनंतर पूर्णवेळ या कार्यात झोकून देणारे रीतसर कार्यालय घरासमोरील मोकळ्या जागेत मूर्त स्वरूपात येत होते एवढेच!
 
दसर्‍याच्या शुभ-मुहूर्तावर कार्यालयाची, ऑफिशीअली मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरले. शहरातील नामांकित वास्तुविशारद आणि मनोहररावांचे शालेय वर्गमित्र श्रीयुत सुनील नेने यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्याचे आधीच निश्चित झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अनेक संस्थांचे अध्यक्ष असलेले वलयांकित नामदार सुधाकर लेले यांना आणून कार्यक्रम देखणा करण्याचा नेने यांचा विचार होता. सदर संकल्पनेचा भव्य आराखडा आणि या नूतन कार्यालयाची अंतर्गत सजावटीचे अंदाजे वीस लाखाचे कंत्राट त्यांच्या डोक्यात तयार होता. तो आराखडा त्यांनी मनोहररावांना सहर्ष सादर केला.
 
सुनील काय हे ? अरे हा काही व्यावसायिक प्रकल्प नाही. भपका कशाला हवाय? एकेका पैशाचा विनियोग हा लोकोपयोगी कार्यासाठीच होणे उचित राहील! मनोहरराव स्पष्टच बोलले. कसय ना, हल्ली स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तसेच मोठे लोकं आकर्षित होण्यासाठी इतका थाटमाट करणे जरुरी आहे मित्रा! नेने साहेब प्रचलित वस्तुस्थितीची जाणीव करून देत म्हणाले.
 
केवळ अंतर्गत सजावटीवर इतका मोठा खर्च करणे, हे ध्येयवादी मनोहररावांना पटेना. येथे गरजूंचे पुनर्वसन होणे अगत्याचे की कार्यालयाचे सौंदर्यीकरण? हा विचार सगळ्यांवर मात करून गेला. पर्यायाने या आपल्या कार्यालयाचे उद्घाटन आणि वास्तुपूजन अगदी साधेपणाने करण्याचा मनोदय नेनेंना कळवला. हे एक मोठे कंत्राट आपल्यालाच मिळेल, हा नेने यांचा होरा चुकीचा ठरला.
 
त्या अनुषंगाने साधी निमंत्रण पत्रिका छापली गेली. कार्यक्रमात भपका अजिबात नव्हता. मंडप-शामियाना बफे भोजन नव्हते. साधा अल्पोपहार ठेवला होता. तरी आजवरचे लाभार्थी आवर्जून उपस्थित झाल्याने लोकांचा भला थोरला जमाव दिसत होता. उद्घाटन हा एक निव्वळ शुभविधी असून तो एक प्रारंभक्षण असतो. त्यापुढे जाऊन आपण काही कार्य करतो, किती प्रगतिशील राहतो ते जास्त महत्त्वाचे! हा विचार प्रेरक आणि आधारभूत वाटला. कार्यक्रमात कुणीही सेलिब्रिटी येणार नव्हताच. केवळ अध्यक्ष आर्किटेक सुनील नेने आणि प्रमुख पाहुणे सुधाकर लेले येण्याचे ठरले होते.
 
सुकृतदर्शनी नाराजी जरी दाखवली नाही, तरी एकूणच मनोभंग झाल्याने खवळलेल्या नेनेंनी मनोहररावांना ऐनवेळी तोंडघशी पाडण्याचा चंग बांधला. सुधाकर लेले यांचेही न येण्याबाबत मन वळवले. कार्यक्रमाची वेळ झाली तरी अजून मान्यवरांचे आगमन झाले नव्हते. मनोहरराव सारखे फोन लावत होते. पण फोन कुणी उचलत नव्हते. नंतर तर फोनही लागत नव्हता. काही मंडळी नेने साहेबांच्या घरी गेली, तेव्हा प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी येण्याची असमर्थता व्यक्त केली. लेले यांनीही अपरिहार्यतेचेे कारण पुढे करून येण्याचे साफ नाकारले.
 
पण उद्घाटन, फित कापणे या बाबी निव्वळ औपचारिक असून त्यांचा मूळ उद्दिष्टाशी फारसा संबंध नाही. आरंभशूर होण्यापेक्षा इप्सित साध्य करणे, हे महत्त्वाचे मानणार्‍या मनोहररावांनी ऐनवेळी एक धाडसी निर्णय घेतला. तेथे अहोरात्र उपस्थित श्रामिक रतन रणदिवे याच्या हस्ते आणि गजानन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन पार पडले. या महात्कार्यात दोघेही श्रमाने जुळलेले असल्याने तेच खरे हक्कदार असल्याचे त्यांचे प्रामाणिक मत होते.
 
गेल्या वर्षी याच संस्थेतून रतनच्या मद्यपी वडिलांना समुपदेशन करून व्यसनमुक्त करण्यात यश आले होते. त्या कृतज्ञतेच्या भावनेतून रतनने आपला सक्रिय सहभाग दर्शवला होता. गजानन म्हात्रे यांचा भाऊ जो सामाजिक प्रतिष्ठा पार गमावून बसला होता. त्याचे नव्या शहरात नव्या ओळखी नव्याने जीवनारंभ असे पुनर्वसन करण्यात मनोहररावांना यश आल्याने गजानन स्वतःला संस्थेचा ऋणी समजत होता. कृतज्ञतेच्या त्यांच्या या भावनेला मनोहररावांचे हे प्रत्युत्तर होते. कृतघ्नते पुढे कृतज्ञतेची जीत हा संदेश यातून जाणार होता ही विशेष समाधान देणारी बाब! कारण हा व्यवसाय नसून ही एक चळवळ होती, जेथे कुणा एका व्यक्तीपेक्षा मानवतेचे मूल्य जपणे अधिक महत्वाचे होते.
 
वास्तुविशारद श्रीयुत सुनील नेने दुसर्‍या दिवशी सकाळी झोपाळ्यावर बसून मंद-मंद झोके घेत होते. चहा-बिस्किटांसोबत ताज्या वृत्तपत्रातील लक्षवेधक बातमी चष्मा लावून, मान वर-खाली करत वाचत होते.
शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री. मनोहर माने यांच्या हे जीवन सुंदर आहे! या मोफत समुपदेशन कार्यालयाचे उद्‌घाटन! कार्यक्रमाचे मनोनीत अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना अपरिहार्य कारणाने येणे शक्य झाले नाही, तरी रतन रणदिवे या श्रमिकाच्या शुभहस्ते आणि श्रीयुत गजानन म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली या ध्येयवादी प्रकल्पाचे उद्‌घाटन साधेपणाने पार पडले. या सोहळ्यास शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
 
••