देशाच्या प्रथम नागरिकाचेही रांगेत उभे राहून मतदान
   दिनांक :12-May-2019
नवी दिल्ली,
देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले. सात राज्यांतील एकूण ५९ मतदार संघांसाठी मतदान झाले. उत्तर प्रदेशातील १४ जागांसह हरियाणातील १०, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ, दिल्लीतील सात आणि झारखंडमधील चार जागांवरील उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. 

 
दरम्यान आज अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दिल्लीत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी सर्व सामान्य नागरिकांप्रमाणेच रांगेत उभे राहुनच मतदान केले. राष्ट्रपती भवन परिसरातील डॉ. राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयातील मतदान केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सविता कोविंद यांनीही मतदान केले. 
 
 
राजधानी दिल्लीतील अनेक बड्या दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे उमेदवार गौतम गंभीर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, तसेच गुरुग्राम येथे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी मतदान केंद्रात जात आपला मतदानाचा हक्क बजावला.