खासगी बस आणि जीपच्या धडकेत 15 ठार
   दिनांक :12-May-2019
हैदराबाद येथून बेंगळुरुकडे जाणाऱ्या खासगी वोल्वो बस आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात 15 जण ठार झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी हा अपघात झाला असून यामध्ये अन्य सहा जण जखमी असल्याचंही समजतंय. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
 
 
हा अपघात कुरनुल जिल्ह्यातील वेलदुर्ती येथे झाला. अपघातातील मृत जोगुलम्बा गडवाळा जिल्ह्यातील रामापुरम या गावातील रहिवासी आहेत. ते सर्व अनंतपूर येथील गुंटकल्लू येथे विवाह ठरवण्यासाठी जात होते अशी माहिती आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर जीपने घरी परतत असताना वेलदुर्ती चेक पोस्ट येथे अपघात घडला. वेलदुर्ती चेक पोस्ट येथे जीप जात असताना विरुध्द दिशेने खासगी बस येत होती. समोरुन येणाऱ्या दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात बस दुभाजक ओलांडून जीपला धडकली.
दुचाकीशी टक्कर रोखण्याच्या प्रयत्नात असलेली बस जीपवर आदळून हा अपघात झाल्याची माहिती आंध्र प्रदेश पोलिसांनी दिली. ही टक्कर एवढी जोरदार होती, की दहा जण जागीच ठार झाले. ‘अपघातात जीपचा जवळजवळ चक्काचूर झाला. अनेक प्रवासी आत अडकून पडले होते. त्यापैकी चार जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना कर्नूल येथे सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,’ अशी माहिती यावेळी देण्यात आली.