अचलपूर उप-डाकघरात लाखोंचा घोळ
   दिनांक :12-May-2019
 ट्रेझरर जयंत गावपांडे मुख्य सुत्रधार
 तिघांवर गुन्हे दाखल
 
 
परतवाडा,
अचलपूर उपडाकघर येथे कार्यरत असणारे खजिनदार जयंत गावपांडेसह दोन डाक कर्मचार्‍यांनी संगणमत करून लाखो रुपयाचा घोळ केल्याचे डाक विभागाच्या तपासात पुढे आले आहे. अमरावती, अंजनगाव उपडाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक कैलास काशीनाथ तायडे यांनी 10 मे रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर अचलपूर पोलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले. 
  
मो. फारुख मो. याकुब व सहाय्यक पोस्टमास्तर वर्षा लहाने अशी गुन्हा दाखल झालेल्या अन्य दोघांची नावे आहे. जयंत गावपांडे 2017 ते 2019 पर्यंत अचलपूर येथील उपडाकघर कार्यालयात खजिनदर पदावर कार्यरत होते. या उपडाक कार्यालय अंतर्गत हरम व अचलपूर बाजार समिती येथील पोस्टाकडून येणारी रक्कम त्यांनी कार्यालयाच्या कॅशबुकमध्ये व शासनाच्या खात्यावर जमा न करता स्वतःच्या फायद्याकरिता शासनाची फसवणूक करून 3 लाख 41 हजार रुपयाच्या रक्कमेची अफरातफर केली.
 
अचलपूर उपडाकघर कार्यालयात जयंत गावपांडे यांनी केलेल्या अफरातफरीचा हा प्रकार आर्थिक वर्ष तपासणीच्या दरम्यान उघडकीस आला. जयंत गावपांडे यांनी 3 लाख 41 हजाराचा गुन्हा केल्यानंतर कोणालाच सुगावा न लागल्याने पुन्हा गुन्हा करित 4 लाख 72 हजाराची रक्कम संगणमताने गहाळ केली. जयंत गावपांडे, मो. फारुख मो. याकुब, वर्षा लहाने यांनी शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरफायदा घेत बापुराव महादेव मेश्राम यांचे 87976168864 या क्रमांकाचे खाते अमरावती येथे ट्रान्सफर केल्यानंतर अचलपूर येथील व्यवहार बंद न करता या खात्यातून खातेदाराची बनावट सही करून पैसे काढले व 4 लाख 72 हजाराची अफरातफर केली. अशा प्रकारे अचलपूर उपडाकघरात लाखो रुपयाचा घोळ करण्यात आला असून यातील मुख्य सुत्रधार जयंत गावपांडे असल्याचे पुढे आले आहे. अचलपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी तपास प्रारंभ केला आहे. डाक कार्यालयात झालेल्या अफरातफरीमुळे तपासात अनेक बाबी पुढे येणार आहे.