अनाकलनीय पवार!
   दिनांक :12-May-2019
विलास पंढरी
9860613872
 
मुंबई बॉम्बस्फोटांच्या वेळी मुस्लिमबहुल मशीदबंदर परिसरात बॉम्बस्फोट झाल्याचे सांगणे व तसे सामाजिक सलोख्यासाठी केल्याचे समर्थन करणे, सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वावरून पक्ष सोडणे व नंतर जुळवून घेणे, पुलोद आघाडी करून मुख्यमंत्री- मंत्रिपद मिळवणे, फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा देणे, माढा मतदारसंघातून लढायचे जाहीर करून अचानक माघार घेणे आणि आता बारामतीत राष्ट्रवादी हरल्यास लोकांचा मतदानप्रक्रियेवरील विश्वास उडेल असे केलेले वक्तव्य... अशा अनाकलनीय घटनांचे शिल्पकार म्हणजे शरद पवार!
 
शरद पवार राजकारणात आल्यापासूनच असलेल्या बालेकिल्ल्याला 2014 च्या मोदीलाटेत, जानकर जर भाजपाच्या कमळ चिन्हावर लढले असते तर कदाचित धक्का लागला असता, असे म्हटले जाते. कारण नेहमी या मतदारसंघात पवार किंवा त्यांचा उमेदवार साडेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्याचे इतिहास सांगतो. पण, गेल्या निवडणुकीत एक कार्यक्षम खासदार असलेल्या सुप्रियाताईंचे मताधिक्य सत्तर हजारांवर आले होते. मताधिक्याला महत्त्व नसून निवडून येणे महत्त्वाचे असल्याचे विधान त्यांना करावे लागले आहे. एवढेच नव्हे, तर फॉर्म भरल्यावर मतदारसंघात फारसे लक्ष न देणारे पवार, बारामतीत अनपेक्षित निकाल लागल्यास इव्हीएमवर शंका घेत, लोकांचा मतदानप्रक्रियेवरील विश्वास उडेल, असा अजब तर्क मांडत आहेत. दोघांनाही हरण्याची भीती वाटत असावी, असे लोकांना वाटू शकेल, अशी ही वक्तव्ये आहेत. सुप्रियाताईंचा मतदारसंघातील संपर्क, संसदेतील त्यांचे कार्य पाहता, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल असे खरेतर वाटत नाही. अर्थात, २३ मे रोजी खरे काय ते समोर येईलच. 

 
 
नेहमी बेरजेचे राजकारण करणारे शरद पवार हे देशाचे, महाराष्ट्राचे जाणते नेते, गेले अर्धशतक राजकारणात आहेत. ते या देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते, पण मराठी माणसाच्या दुर्दैवाने आणि पवारांच्या विचित्र वागण्यामुळे तसे होऊ शकले नाही.
 
बारामती आणि जवळपासच्या भागात पवारांना देव मानले जाते. सर्वच जातिधर्माच्या लोकांची ‘साहेब’ काळजी घेतात. त्यामुळेच तेथील जनताही तेवढेच प्रेम करते. असे असूनही पवार मधूनमधून अनाकलनीय वागतात. मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात माथाडी कामगारांच्या मेळाव्यात, मुंबईत मतदान करून बोटावरची शाई पुसून परत गावी जाऊन घड्याळाचे बटण दाबा, असे गमतीने म्हटल्याने पवार गोत्यात आले होते. कोल्हापूरच्या संभाजी राजांना भाजपाने खासदार केल्यावर, पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे, आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात, अशी जातीयवादी टिप्पणी फडणविसांवर त्यांनी केली होती.
 
दोन वर्षांपूर्वी पुण्यातील इफ्तार पार्टीच्या भाषणात असेच काही वादग्रस्त मुद्दे पवारांनी मांडले होते. छत्रपती मुसलमानविरोधी नव्हते, गोब्राह्मण प्रतिपालकही नव्हते. विशिष्ट लोकांनी असा इतिहास लिहिला आहे. हे त्यातील काही. शिवाजी महाराजांचा आपल्याच लोकांनी विश्वासघात केल्याचे भरपूर दाखले इतिहासात आहेत. पण, या भाषणात केवळ एका कुलकर्णीचे नाव त्यांनी घेतले होते.
 
ज्याने संभाजी महाराजांचा घात केला तो बाजी घोरपडे, अफझल खानाला फितूर झाला तो खंडोजी खोपडे, शिवरायांच्या विरुद्ध चालून आला तो जावळीचा मोरे, औरंगजेबाला जाऊन मिळालेला सूर्याजी पिसाळ, शंभू राजांना पकडून देणारा गणोजी शिर्के, सरंजामदार बनून वतनासाठी शिवरायांना त्रास देणारे देशमुख, पाटील, अर्ध्या रात्री शिवरायांवर हल्ला केला तो व्यंकोजी, पन्हाळगडच्या मोहिमेची आदिलशहाला बातमी देणारा शिंगणापूरचा देशमुख, शिवरायांवर चालून आलेला त्यांचाच चुलता मंबाजी भोसले हे सगळे आपलेच लोक होते. गद्दारी, फितुरी हा कुठल्याही एका ठरावीक जातीचा, पंथाचा दुर्गुण नाही. असे लोक प्रत्येक जातीत आढळतात. इतिहासाच्या पानापानांवर अशा गद्दारांची नावे आढळतात. यातील काहीतर शिवरायांचे नातेवाईकही होते. विविध जातीतील अनेक मराठी सरदार औरंगजेबाची चाकरी करत होते, ब्राह्मण वकील म्हणून काम करीत होते. त्या त्या काळातील परिस्थितीप्रमाणे लोक वागत असतात, असे म्हणून सोडून द्यायला हवे.
 
एकट्या कुलकर्णीचा उल्लेख करून पवार काय साधू इच्छित होते? पुणेरी पगडी हे विद्वत्तेचे प्रतीक समजले जाते. आगरकर, गोखले, टिळक असे अनेक विद्वान ही पगडी वापरत असत. शरद पवारांसहित हजारो लोकांचा सत्कार पुणेकरांनी ही पगडी घालून केला आहे, त्यांपैकी कुणीही ती कधी नाकारल्याचे ऐकिवात नाही. पुण्यातील शिंदेशाही पगडीही प्रसिद्ध आहे. महात्मा फुले वापरीत ती खरेतर पगडी नव्हेच. पण, तरीही नावातच महात्मा असलेल्या फुलेंची पगडी, भष्टाचाराच्या आरोपाखाली दोन वर्षांपेक्षा अधिक वर्षे तुरुंगात असलेल्या व केवळ जामिनावर सुटलेल्या, केवळ ते फुल्यांच्या जातीचे आहेत म्हणून घालणे हा फुल्यांचा अपमान तर आहेच, पण डोक्यावर घातलेली पुणेरी पगडी काढून त्या जागी दुसरी घालणे हा पुणेकरांचाही अपमानच आहे.
 
खरेतर अल्पसंख्येत असलेल्या ब्राह्मण आणि बहुसंख्येने असलेला मराठा समाज या दोघांचा एक सवर्ण महासंघ निर्माण करून त्याचे नेतृत्व शरद पवारांनी करावे. त्यामुळे दोन्ही समाजांचा फायदा होऊन राज्यालाही फायदेशीर ठरेल. आपल्या उतारवयात एक मोठे कार्य केल्याची नोंद त्यांच्या नावे होऊ शकेल. पवार तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. केंद्रात संरक्षण आणि कृषिमंत्री होते. मोदी त्यांना गुरुस्थानी मानतात. जीएसटी लॉंिंचगच्या, संसदेच्या सेण्ट्रल हॉलमधील ऐतिहासिक समारंभात पहिल्या रांगेत अडवाणींशेजारी जागा देऊन मोदी सरकारने पवारांबद्दलचा आदर दाखवला होता. प्रचाराच्या सभेत एकमेकांचे वाभाडे काढणे, ही राजकीय अपरिहार्यता आपण थोडा वेळ बाजूला ठेवू यात. ‘जाणता राजा’ अशी उपाधी लाभलेल्या पवारांकडून वरच्या पातळीवरच्या व जातिविरहित राजकारणाची जनतेची अपेक्षा आहे.
 
खरेतर शरद पवार हे हवेचा रूख ओळखणारे चाणाक्ष नेते आहेत. माढा मतदारसंघातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील अंतर्गत लाथाळ्या लक्षात घेत लढण्याचे जाहीर करूनही सुज्ञपणे माघार घेतली. मोहिते-पाटील घराण्याने कॉंग्रेसशी घेतलेली फारकत बघता, हे किती योग्य होते ते नंतर कळलेच. भाजपाला बहुमत मिळणार नसल्याचे ‘भविष्य’ वर्तवितानाच, शरद पवार यांनी पंतप्रधानपदासाठी ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू या स्पर्धेत असतील असे सांगत, एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे संभाव्य दावेदार नाहीत, असे सूचित करून त्यांनी आपल्या राजकारणाची दिशाही स्पष्ट केली. राहुलना थेट नाराज करणे परवडणारे नसल्याचे लक्षात आल्यावर, आपल्या बोलण्याचा विपर्यास झाल्याचा खुलासा करून त्यांनी राजकीय चातुर्यही दाखवले.
 
एकूणच 23 मे-नंतरचे राजकीय वातावरण कसे असेल, याबद्दलचे पवारांचे म्हणणे या निमित्ताने पुढे आले. पवारांचे असे बोलणे हा एखाद्या मोठ्या योजनेचा भाग असतो, हा इतिहास आहे. पवारांचे हे एक वेगळे वैशिष्ट्य असल्याने ते अधूनमधून अशी चकित करणारी विधाने करून जनमत आजमावत असतात. ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यापूर्वी मोदींनी माझा सल्ला घेतला होता असा अर्थ निघेल, असे विधान करून अशीच सनसनाटी त्यांनी निर्माण केली होती. त्यांच्या समर्थकांना हे योग्य वाटत असले, तरी पवार आपली विश्वासार्हता दरवेळी पणाला का लावतात, हा प्रश्न उरतोच. निवडणूक निकालानंतर खरोखर त्रिशंकू संसद तयार झाली व प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची वेळ आली, तर पवार हाच सर्वमान्य पर्याय म्हणून पुढे येईल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. खरेतर देवेगौडांसारखी पंतप्रधानपदाची लॉटरी शरद पवारांना लागली, तर तमाम मराठी जनतेला अत्यानंदच होईल. आपले समर्थक वस्तुस्थितीपासून दूर असल्याची जाणीव पवार यांना असली, तरीही मनाच्या एका कोपर्‍यात त्यांचेही अंकगणित सुरूच असावे. पण, लढवत असलेल्या सर्व 22 जागा जिंकल्या, तरी पंतप्रधानपद शक्य नसल्याचे प्रांजळपणे ते स्पष्टही करतात.
 
इलेक्ट्रॉनिक्समधे विशेष गती असलेली नात्यातील एक मुलगी आहे. तिला मी एकदा इव्हीएम टॅम्परिंगबद्दल विचारले होते, तेव्हा दिलेले उत्तर असे होते- ही फक्त राजकीय चर्चा आहे. या इव्हीएमना बाहेरून काहीही कनेक्टिव्हिटी नाही (इंटरनेटसारखी). शिवाय प्रत्येक इव्हीएममधे उमेदवारांची माहिती एक एक करून भरली जाते. त्यामुळे एका मतदारसंघात समजा 3000 इव्हीएम मशीन असतील, तर त्या प्रत्येक मशीनला स्वतंत्रपणे (कनेक्टिव्हिटी नसल्याने) टँपर करावे लागेल व असा प्रत्येक मशीनला पोलिस संरक्षण असताना ॲक्सेस मिळणे कसे शक्य आहे? एका मतदारसंघात ही स्थिती तर 543 मतदारसंघांत हे होणे शक्य आहे का, याचा तुम्हीच आता विचार करा, असे ती ज्या आत्मविश्वासाने आणि अभिमानाने म्हणाली की, त्यामुळे माझ्या मनातही असलेली काही प्रमाणातील शंका पूर्ण निघून गेली. निवडणूक आयोगाने पर्याप्त वेळ देऊनही देशातील कुठलाही पक्ष इव्हीएम मशीन टँपर करायला का पुढे आला नाही, याचे खरे कारण हे आहे. सर्वच विरोधकांप्रमाणे इव्हीएमवर शंका उपस्थित करत शरद पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. इव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे मी ऐकून आहे. यंदा भाजपा नेते सांगतात तसा बारामतीत अनपेक्षित निकाल लागला, तर लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडेल आणि एकदा विश्वास उडाला की ते कोणत्याही टोकाला जातील, असे टोकाचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.
 
पवार पराभूत मानसिकतेतून असे बोलत असून, पराभवाआधी कारणे तयार ठेवत असल्याचा पलटवार महाजन यांनी केला आहे. ते बारामतीत जिंकले तर लोकशाही जिवंत अन्‌ आम्ही जिंकलो, तर लोकशाही धोक्यात, याला काही अर्थ नसल्याचेही महाजन म्हणाले. इव्हीएममध्ये छेडछाड करता आली असती, तर आम्ही चार राज्यांत हरलो नसतो. कॉंग्रेसने जिंकलेल्या तीन राज्यांत त्यांनी मशीनमध्ये छेडछाड केली असे आम्ही म्हटले नाही, असेही महाजन म्हणाले. गेल्या वर्षी असेच त्यांच्या सौम्य राजकीय प्रकृतीला न शोभणारे विधान शरद पवारांनी केले होते. कर्जमाफीचा लाभ मिळाल्याशिवाय सरकारचे कोणतेही कर, वीज बिल भरू नका, असे आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केले. तसेच शेतकर्‍यांना त्रास दिला किंवा त्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न झाल्यास बळीराजा सरकार उलथवून टाकेल, असा सक्त इशाराही पवारांनी दिला होता. नागपूरच्या विधिमंडळावर काढण्यात आलेल्या मोर्चात पवारांनी भाजपा सरकारच्या विरोधात सरळसरळ बंडाचीच भाषा केली होती. कर भरू नका, हे सरकारच्या अधिकाराला थेट आव्हान असते. ब्रिटिशांविरुद्ध लढताना क्रांतिकारकांनी या हत्याराचा वापर केला होता.