मातीत गवसलेला ‘रत्न’

    दिनांक :12-May-2019
मिलिंद महाजन 
7276377318
भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रतिभावान खेळाडूंचा वाणवा नाही. या भारतभूमीवर रत्नांची खाण आहे. अशा प्रतिभावानरत्नां माळेतील एक मौल्यवान रत्नाची निवड करणे अवघड असते. अशाच रत्नांमधील एक रत्न म्हणजे बजरंग पुनिया. आपल्या शक्ती-सामर्थ्य, कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर बजरंग आज त्रिलोकात आपल्या यशाचे झेंडा फडकवत आहे. मात्र गतवर्षी हा रत्न दुर्लक्षित राहिला व त्यामुळेच त्याचा देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार- ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारापासून तो वंचित राहिला. आज नाही मिळाला नाही, म्हणून ना उमेद न होता, उद्या नक्कीच मिळेल, याच आशेने आणि विश्वासाने तो पुन्हा तेवढ्याच जिद्दीने आपले कर्तृत्व करत आहे आणि देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवत आहे.  
 
 
 
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि जकार्ता आशियाड क्रीडा स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी बजावल्यानंतर बजरंगने अलीकडेच आशियाई कुस्ती स्पर्धेत तसेच रशियात झालेल्या कुस्ती स्पर्धेतही आपल्या प्रदर्शनातून सुवर्णमय चकाकी दाखविली. अशा या चमकदार प्रदर्शनामुळेच बजरंगला अलिकडेच न्यू यॉर्कच्या प्रसिद्ध मेडिसन स्क्वेअर गार्डन येथील ‘ग्रॅपल अँड गार्डन- बीट दी स्ट्रीट्‌स’ या उपक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. रशियातली कुस्ती गाजविल्यानंतर बजरंगने थेट अमेरिकेतील न्यू यॉर्क गाठले. मेडिसन स्क्वेअरमध्ये खेळणारा पहिला भारतीय कुस्तीपटू म्हणून बजरंगने मान मिळविला. यात बजरंगने 65 किग्रॅ् वजनगटात अमेरिकेच्या यियानी डायकोमिहाईलिसविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी लढला, परंतु थोडक्यात म्हणजे 8-10 अशा दोन गुणांच्या फरकाने हरला. मात्र त्याचे कुस्ती कौशल्य बघून क्रीडारसिक मंत्रमुग्ध झालेत.
 
गत जानेवारी महिन्यातही चौथ्या प्रो-रेसलिंग लीग मोसमात बजरंगने आपल्या सातपैकी सात लढती जिंकण्याची कमाल केली होती. आता बजरंग पुढे एकच ध्येय आहे, ते म्हणजे देशाला पुनिया आगामी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये (65 किग्रॅ, फ्रीस्टाईल कुस्ती) भारताला सुवर्णपदक जिंकून देणे.
 
आतापर्यंत खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिकने देशाला कांस्य व रौप्यपदक जिंकून दिलेत, पण सोनेरी यश प्राप्त करणे कोणत्याही कुस्तीपटूला जमले नाही. मात्र ही असाध्य, असाधारण कामगिरी मी करून दाखविणार या जिद्देने बजरंग पेटला आहे. त्याची जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, कौशल्य व कठोर मेहनत घेण्याची वृत्ती बघून तो आपले ध्येय निश्चित गाठेल, असा क्रीडाप्रेमींना विश्वास आहे.
 
आता फक्त प्रश्न आहे, कुस्तीतल्या या रत्नाचा प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने गौरव होण्याचा. गतवर्षी पद्मश्री बजरंगकडे दुर्लक्ष झाले. गुणांकनात पैकीच्या पैकी गुण मिळाले असले तरी त्याला खेलरत्न पुरस्कारापासून वंचित राहावे लागले व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खेलरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यामुळे बजरंग थोडा निराश झाला होता व त्याने न्यायालयात जाण्याची धमकी दिली होती.
 
आता यंदा या खेलरत्न पुरस्कारासाठी कुस्ती महासंघाने बजरंगसह विनेश फोगाटच्या नावाची शिफारस केली आहे, तर तिकडे नेमबाजी संघटनेने आपल्या दोन नेमबाजांची शिफारस केली आहे. राष्ट्रकुल व आशियाड सुवर्णपदक विजेत्या विनेश फोगाटने पाचपैकी पाच लढती जिंकल्या. आता नवीन वजनगटात खेळतानाही विनेशने चांगले यश संपादन केले आहे. आता बघू निवड समिती यंदा तरी बजरंगला न्याय देईल काय, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.