अद्भुत! अकल्पनीय!! अनाकलनीय!!!
   दिनांक :12-May-2019
शिवदीपस्तंभ  
डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490
  
शास्ताखानाचा जाच स्वराज्याला सुरू झाला होता. खानाची सेना म्हणजे 77 हजारांचे घोडदळ, अगणित पायदळ, अमाप खजिना, तोफा, दारुगोळा, शस्त्रसामुग्री यांनी परिपूर्ण अशी बादशाही सेनाच होती. स्वतः खानाला बादशाह औरंगजेबाची प्रतिकृती मानण्यात येत असे. औरंगजेबाची आई मुमताज-उल-जमानीचा हा सख्खा भाऊ होता. शाहिस्तेखान! खान-इ-खानान, अमील-उल-उमराव, नवाब-ए-आझम, मिर्झा, अबू तालिब शाहिस्ताखान. शहाजहान बादशाह असताना आपल्या मुलीकरवी त्याने शास्ताखानाच्या बायकोला जेवायला बोलावले व तिच्यावर अत्याचार केला होता. त्यामुळे चिडलेला खान शहाजहानचा विरोधक होता व पुढे औरंगजेबाने तख्तासाठी शहाजहानला कैद केल्याने खान औरंगजेबाचा पक्षधर होता. तो फक्त नातेवाईकच नव्हे तर मुघलिया सल्तनतीचा सरनौबत सुद्धा होता. हा अहमदाबादेचा सुभेदार राहिलेला होता अन्‌ आता त्याला दख्खनची सुभेदारी देण्यात आली होती. एकूणच बादशाहीमधले हे वजनदार प्रस्थ होते. स्वभावाने अतिशय रंगेल असलेला खान मोगली रिवाजाप्रमाणे विलासीसुद्धा होता. शास्ताखानाच्या महालात शराब आणि नाचगाण्याच्या मैफली झडू लागल्या. ज्या लाल महालात राजांचे संस्कारक्षम बालपण जिजामातांनी घडविले, तिथे खानाच्या जनान्याचा रंगेल खेळ सुरू झाला. मदिरा आणि मांस यांच्या मेजवान्या होऊ लागल्या. 

 
 
 
शिवाजी महाराजांचा पोर्तुगीज चरित्रकार कॉस्मी-द-गार्द लिहितो की- खानाच्या लवाजम्यासोबत 300 हत्ती असत. हे भांडते हत्ती नसून मालवाहू होते. यापैकी 150 हत्तींवर खानाच्या एका तंबूची सामुग्री असे तर उरलेल्या 150 हत्तींवर दुसर्‍या तंबूची! खानाचा तळ एका जागी पडला की हे 150 हत्ती पुढल्या मुक्कामाच्या ठिकाणी नेले जात आणि तिथे खानाचा तंबू उभा केला जात असे. त्याची सदर 60 फूट लांब व 30 फूट रुंद असे. इतकेच नव्हे, तर त्याच्या लवाजम्यासोबत 2 लाख फुलझाडेही असत. जणूकाही नैसर्गिक फुलबागच तिथे अस्तित्वात आहे, असा आभास व्हावा. असो.
 
इकडे राजे सिद्दी जौहरच्या तावडीत पन्हाळगडावर अडकले होते. या मोक्याच्या क्षणी खान जर कोकणात उतारला असता तर स्वराज्याच्या ऐन गाभ्यालाच धक्का बसला असता. नेतोजी पालकरांनी मोगलांना उत्तर आघाडीवर थोपवून धरले, ही फार मोठी कामगिरी त्यांनी बजावली होती. शिवाय मोगलशाही व आदिलशाही एक झाली असती तर स्वराज्यासाठी हे संकट कदाचित प्राणांतिकच ठरले असते. राजे पन्हाळ्यावर गुंतून पडले असल्याने निर्णायक आघाडी उघडता येत नव्हती. राजे पन्ह्याळ्यावरून बाहेर पडले व आपल्या सोयीसारखा मैत्रीचा तह त्यांच्याशी करून आदिलशाहीला शांत करून टाकले. आता राजे आपले सारे लक्ष मोगलांवर केंद्रित करायला मोकळे होते. त्याआधी जिजाऊसाहेबांच्या आदेशावरून मराठी सैन्य खानाच्या फौजांवर छापे घालतच होते. पण ते नाकाफी होते. तिकडे कारतलबखान नावाच्या सिपहसालाराने अदिलशाहीकडून नुकताच परिंडा मिळवून दिला होता. खानाने त्यालाच कोकणावर स्वारी करण्यास पाठविले. सोबत भली थोरली फौज, नामवंत सरदार अन्‌ माहूरची ‘रायबाघन’ (हा किताब आहे, अर्थ- राजव्याघ्री) सावित्रीबाई सुद्धा होती.
 
सह्याद्रीची माहिती नसताना कारतलबखान उंबरिंखडीत उतरला आणि आधीच दबा धरून बसलेल्या शिवाजीराजांच्या फौजेने त्याचा तुफानी पराभव केला. रायबाघनच्या सल्ल्याने त्याचा जीव वाचला. मीरा गडावर शास्ताखानाच्या भाच्याचा असाच दारुण पराभव झाला. चाकणच्या किल्ल्यावर खानाने केलेले आक्रमण अन्‌ तिथे झालेला कडवा प्रतिकार, त्याला मराठी शक्ती आणि चिवटपणा दाखविण्यासाठी पुरेसा होता. तरी पण चाकणचा भुईकोट खानाच्या खिशात गेलाच. पुणे, सुपे, इंदापूर या भागावर त्याने ताबा मिळविलेलाच होता. जनता त्याच्या भयाने गाव सोडून जंगल अन डोंगराच्या आश्रयाला निघून गेली. पुणे प्रांत तर त्याने उजाड करून टाकला होता. खानाची उपस्थिती स्वराज्याला जाचक ठरत होती. तिकडे राजे सिद्दीच्या तावडीतून सुटले अन्‌ आता शास्ताखानाचे उच्चाटन करणे त्यांना क्रमप्राप्त झाले होते.
 
राजे राजगडावर आलेत अन दिवसरात्र याच गोष्टीचा विचार त्यांच्या डोक्यात फिरू लागला. स्वराज्याच्या फौजेच्या लहान लहान तुकड्या चहू बाजूंनी खानाच्या फौजेवर तुटून पडत होत्या. शक्य तेवढी कापाकापी करत व खानाची फौज जागी होण्याच्या अगोदर पोबारा करत होत्या. या तुकड्यांच्या मागे धावणे म्हणजे सैतानाच्या मागे धावणे होते, मोगलांच्या हाती काहीही लागत नसे. अर्थात या छाप्यांनी खानाच्या अवाढव्य लष्कराचे काहीही बिघडणार नव्हते. आणि हळूहळू राजांचाही लक्षात आले की ही वरवर छाटणी करून चालणार नाही. शास्ताखानाला हुसकून लावायचे असेल तर मुळावरच घाला घालावा लागेल. आणि राजांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेतून एक अद्‌भुत, अचाट कल्पना बाहेर पडली.
 
राजांची गुप्तचर यंत्रणा अतिशय प्रभावी होती. त्याचे जाळे विशाल होते. राजे आपल्या हेरांवर भरपूर पैसे खर्च करत व हे हेरच त्यांना सर्व बारीक सारीक माहितीचा पुरवठा करत. या माहितीच्या आधारे राजे आपल्या सर्व योजना तयार करत अन्‌ त्याचे काटेकोर क्रियान्वयन करत असत. गंमत पहा- लाल महालात माळ्याचे काम करणारा शिवाजीराजांचा गुप्तहेर होता. लाल महालाबद्दलची सूक्ष्माती सूक्ष्म माहिती त्याच्याकडून राजांकडे पोहोचत होती. खानाने कोणते बदल केलेले आहेत, कोणत्या नव्या भिंती, दरवाजे, खिडक्या निर्माण केल्या आहेत आणि कोणते जुने दरवाजे बंद केलेले आहेत, स्वतः खानाचा मुक्काम कुठे असतो, त्याचा जनानखाना कुठे आहे, त्याची शस्त्र कुठे असतात, पहारा कुठे कमी कुठे जास्त असतो, अशा सर्व महत्वाच्या बातम्या सातत्याने राजांपर्यंत पोहोचत होत्या.
 
एक अशी माहिती मिळाली की- हा कालखंड बादशाच्या राज्यारोहणाच्या वाढदिवसाचा होता, त्यामुळे प्रत्येक प्रहरात नगारे वाजवले जात. हे नगारे सकाळी 6 व 9, दुपारी 12 व 3, सायंकाळी 6, रात्री 9 व 12, पहाटे 3 ला वाजवले जात. याचाही वापर राजे कल्पकतेने करवून घेणार होते. पण सर्वात महत्त्वाची बातमी आता आलेली होती अन्‌ ती होती खानाच्या सुरक्षाव्यवस्थेसंबंधी! राजांना समजले की- रोज सकाळी व संध्याकाळी एका ठराविक वेळेला खानाच्या लष्कराचे चौकी पहारे आपली पाळी संपवून आपापल्या छावण्यांकडे परत जात व नवीन पहारे त्यांची जागा घेत. पण या सगळ्या माहितीच्या जोरावर राजे काय करणार होते? खानाची सामरिक शक्ती राजांच्या कैक पट होती. लाखावर सैन्य त्याच्याकडे होतेच अन्‌ राजांकडे 20-22 हजारांवरही फौज नव्हती. मग राजांच्या मनात काय घाटत होते. राजगडावर खलबतं दिवसरात्रीची बंधने तोडत होती. काहीतरी विलक्षण योजना आकाराला येत होती. पण गुप्तता इतकी प्रचंड होती की कुणाला ही काहीही सुगावा लागत नव्हता.
 
ही मोहीम हाती घेताना काही महत्त्वाचे प्रश्न समोर उभे होते. शास्ताखानाला मदत करू शकेल, अशा नावांमध्ये एक मोठे अन महत्त्वाचे नाव होते- जसवंतसिंह राठोड! राजांची सेना राजगडावरून पुण्यात येताना जसवंतसिंहाला जराही संशय आला तर मुख्य लढाई सुरू होण्याच्या आधीच एका अनावश्यक लढाईला तोंड फुटू शकणार होते. ही मोहीम इतकी नाजूक, गुप्त आणि संवेदनशील होती की- त्यामध्ये अर्थातच राजांनी शत्रूगोटातील जसवंतसिंहाला सामील करण्याचा धोका कधीही पत्करला नसताच. पण शिवाजीराजांनी जसवंतिंसहाला तटस्थ राहण्यास बाध्य केले किंवा हिंदवी स्वराज्याच्या धाग्यात त्याला बांधून घेतले होते हे सांगणारा एकही पुरावा इतिहासाकडे नाही. पण या संपूर्ण मोहिमेमध्ये लाल महालापासून इतक्या जवळ असलेला जसवंतिंसह या प्रकरणापासून दूर कसा राहिला, हे प्रत्यही न उलगडलेले एक कोडे आहे.
 
राजांनी विशेषत्वाने साधारण हजार लोकांची निवड केली होती. हे सर्व जालीम लढवय्ये होते. यातले काही जण (अंदाजे 400 मावळे) या विशेष मोहिमेमध्ये भाग घेणार होते तर काही मदतनीस म्हणून वेगवेगळ्या जागी आवश्यकतेनुसार तैनात राहणार होते. कात्रजच्या जंगलांकडेही काही लोकांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात अली होती. बाबाजी व चिमणाजी देशपांडे हे सोबत राहणार होते कारण त्यांचे बालपण लाल महालाच्या सान्निध्यात गेले होते. याशिवाय स्वतः नेतोजी पालकर, तान्हाजी मालुसरे, येसाजी कॅक असे दिग्गज सांगाती होते. पण सर्वात मोठी, आश्चर्याची पण तितकीच चिंताजनक गोष्ट होती स्वतः महाराज या मोहिमेची आघाडी सांभाळणार होते. या 400 लोकांचे काही विशेष प्रशिक्षण व रंगीत तालीम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जिथे जायचे आहे, तिथे आक्रमण करताना प्रयोगाला वाव नव्हता. जो कार्यभाग साधायचा तो पहिल्याच तडाख्यामध्ये साधायचा होता. इथे अपयश आले तर पुन्हा असा धाडसी प्रयत्न होणे नाही हे निश्चित होते. रात्र निवडण्यात आली होती, चैत्र शु. अष्टमीची!
 
दुसर्‍या दिवशी होती रामनवमी! इंग्रजी तारीख होती- दि. 5 एप्रिल 1663 ची मध्यरात्र! काही विशेष होते का या दिवसाच्या निवडीमागे? की इतर रात्रींप्रमाणे ही एक सामान्य रात्र होती? या रात्रीचा अन्‌ इस्लामचा काही संबंध होता का? राजांना त्याचीही माहिती होती का? राजे 77 हजार मोगल सैन्यावर अक्रमण करायला तर निघाले नव्हते ना? खानाच्या अवाढव्य ताकदीपुढे राजांची मूठभर सेना किती वेळ टिकणार होती? हे वेडे धाडस तर ठरणार नव्हते ना? इतिहासामधल्या अशा लढायांमध्ये देवगिरी, चित्तोड, विजयनगरचे काय झाले हे राजांच्या ऐकिवात नव्हते का? होते ना! शिवरायांचा इतिहासाचा पूर्ण अभ्यास होता. इतिहासात आपण भारतीयांनी केलेल्या चुका, जिवंत सोडून दिलेले गद्दार, राज्याबाहेर हाकलून दिलेले विभीषण, शत्रूशी केलेली अनावश्यक चर्चा अन्‌ आमची सद्गुण विकृती या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास राजांनी केला असावा, असे दिसते. म्हणूनच अशा ऐतिहासिक चुका महाराजांनी केल्याचे दिसत नाही.
 
ही मोहीम काही साधी सुधी अन्‌ भावनातिरेकाने हाती घेतलेली मोहीम नव्हती. हे होते महाराजांच्या प्रगल्भ अन्‌ सावध बुद्धिमत्तेतून बाहेर आलेले, चक्रव्यूह भेदून जाणारे अन्‌ त्यातून सहीसलामत बाहेर पडणारे, अद्भुत, अकल्पनीय, अनाकलनीय युद्धतंत्र! आपल्या कमीत कमी शक्तीनिशी जास्तीत जास्त शत्रूला नामोहरम करणारी एक विलक्षण मोहीम होती ही! आधी कुणी असे काही कधी केले होते का? भारतीय इतिहासात तरी या प्रश्नाचे उत्तर कदाचित नकारात्मकच मिळेल इतके हे अभिनव होते. राजे करणार तरी काय होते? नक्की काय होती ही मोहीम?
 
हा होता शास्ताखानाच्या लाल महालावर शिवाजीराजांच्या निवडक 400 सैनिकांचा धाडसी छापा! भारतीय इतिहासातील पहिला वहिला ‘कमांडो अटॅक!’
(क्रमशः)

(लेखक कार्पोरेट आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)
••