लहानपण देगा देवा, मनी वसतो गवा..!

    दिनांक :12-May-2019
यादव तरटे पाटील 
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
www.yadavtartepatil.com
9730900500
 
सूर्यकिरणांच्या पिवळ्याधम्म चादरीत पांघरलेल्या जंगलाच दृश्य मनोहारीच असतं. अशा वातावरणात आम्ही तारुबाबा मंदिराजवळून पायी तलावाकडे जात होतो. सिकाड्याचा किर्रऽ किर्रऽऽ आवाज कानात गुंजत होता. मध्येच चितळांचा मोठ्या थव्याने वर्दी दिली. भिरभिर डोळे करत एक एक चितळ रस्ता ओलांडताना पाहून आम्ही थक्क झालो. ताडोबा तलावाजवळ पोहोचताच, मागून गुरुजींचा आवाज कानी पडला. गुरुजी मोठ्याने ओरडले, ‘‘बे पोट्टेहो मगर हाये ना बे तेथी, यीन बाहेर त खाईन ना बे तुमाले..!’’, गुरुजींचा हा जोरदार पुकारा कानी पडताच आम्ही विश्राम गृहाकडे परत निघालो. आम्हाला एका रांगेत चालण्याच्या सुचना देत देत गुरुजी मागून येत होते. अंधार पडायला सुरवात झाली होती.
 
वाढलेल्या गवतातून चालताना आधीच घाबरगुंडी उडाली असताना अचानक मध्येच भूस्कन रानडुकरांची रांग धावत गेली. एक पिल्लू तर चक्क माझ्या पायाखालून गेलं. आम्ही पार घाबरून गेलो. क्षणात काय होतं अन्‌ काय झालं, याचा विचार करतो न तोच मागून माझ्या मित्राने मला ढकललं. ‘‘बे च्याल न बे, च्याल नऽ मरत का बे येथी..!’’, एकाही क्षणाचा विचार न करता आम्ही तिथून पोबारा केला, तो थेट विश्राम गृहाकडे जाऊनच दम घेतला. रात्र झालीच होती, आम्ही लवकरच झोपण्यासाठी खोलीत गेलो. हळूहळू वन्यप्राण्यांचे आवाज अधिक तीव्र होऊ लागले. मात्र, दिवसभर दमल्याकारणाने आम्हाला लवकरच झोप लागली. सकाळीच गुरुजींचा खडूस आवाज काणी पडला अन ताडकन आम्ही जागे झालो. 

 
 
महिंद्रा जिपमध्ये कोंबून कोंबून किती बसवले होते देव जाणे; पण मिळेल त्या जागेतून वाकडतीकडे होत आम्ही प्राणी पाहायची धडपड करू लागलो. शरीराने अजस्त्र, कधी शांत तर कधी आक्रमक स्वभाव असलेला रानगवा पहिल्यांदा पाहून मनात धडकी बसली होतीच. काळा रंग, पिळदार शरीर असलेला रानगवा आक्रमक वाटत होता. तो नर होता. आमची गाडी काही वेळ थांबली. हळूहळू कळपातील एक एक गवा पुढे येऊ लागला. पाहता पाहता वीस गव्यांचा कळप आमच्या स्वागताला तयार झाला. अर्धा तास होऊनही एकही गवा हलायला तयार नव्हता. कळपाच्या प्रमुखाला बहुदा आमची दया आली असावी. स्वारी पुढे सरकताच काही मिनटातच गवे दिसेनासे झालेत. इयत्ता दहावीत असताना शाळेच्या भद्रावतीहून निघालेली आमच्या ताडोबा ट्रीपची ही आठवण आजही स्मरणात आहे.
 
गवा हा वन्यप्राणी अत्यंत शक्तिशाली असून निवांत भटकंती करतो. गरज पडल्यास प्रचंड वेगानेदेखील धावू शकतो. पाळापाचोळा, रानगवत व प्रसंगी झाडाच्या साली खाऊन रानगवा जगतो. वेळेप्रसंगी वाघालाही पिटाळून लावणारा व जिप, बस सारख्या चारचाकी मोठ्या वाहनांनाही उलथविण्याची ताकद ठेवणारा गवा शाकाहारी असून भूचर प्रकारात मोडतो. भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत रानगवा आढळतो. रानगव्याला इंग्रजीत ‘इंडियन गौर’, असे म्हणतात. रानगव्याचे शास्त्रीय नाव ‘बॉस गौरस’ असून हा भारतात सातपुडा पर्वत रांगातील मेळघाट, ताडोबा, पेंच तसेच पश्चिम घाट, निलीगिरी पर्वत, पेरियारचे जंगल, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा प्रांतात आढळतो. हत्ती, गेंडा या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे. प्रौढ गव्याचे वजन अंदाजे 800 ते 1200 किलो असते. हा प्राणी अंदाजे 5 ते 30 च्या संखेत समूहाने राहतो.
 
आय.यु.सी.एन.च्या लाल यादीत गव्याचा समावेश असून जागतिक स्तरावर धोक्याला बळी पडू शकणारे प्राणी (व्हलनरेबल) या यादीत रानगव्यांचा समावेश होतो. दिवसेंदिवस संख्या कमी होत असताना आजही महाराष्ट्रातील गव्यांचा गवगवा होताना आपल्याला दिसून येतो. अनेक पर्यटक रानगवा पाहण्यासाठी आसुसलेले असतात. दाजीपूरच्या जंगलातील खरा मानबिंदू म्हणजे रानगवा होय. महाराष्ट्रात चांदोली राष्ट्रीय उद्यान तसेच दाजीपूर हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. एकुणच काय तर चांदोली व दाजीपूर मधील गव्यांचा गवगवा सातासमुद्रापार पोहोचलाय, यात काही शंकाच नाही. मात्र गव्यांचा केवळ गवगवा न होता त्यांच्या संवर्धनाचादेखील गवगवा करून शाश्वत संवर्धन अपेक्षित आहे. ताडोबा, मेळघाट व पेंच सारख्या जंगलातल्या पाणवठ्यांवरही त्यांचं दर्शन होतं.
 
एका शक्तिशाली नराच्या अधिपत्याखाली माद्या व पिलांचा कळप जंगलात निर्धास्तपणे चरत असतो. नर अत्यंत आक्रमकपणे आपल्या कळपाचं आणि आपल्या नियंत्रणाखालील परिसराचं रक्षण करतो. माणसाने आपल्या मर्यादा ओलांडून त्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण होय. मात्र सुरक्षित अंतर ठेवल्यास गवयांना जंगलात शांत राहून पाहण्यात एक वेगळा आनंद आहे. जंगलातल्या प्रत्येक प्राण्यांच आपलं एक स्वतंत्र विश्व आहे. या विश्वात एक विशिष्ट मर्यादेत डोकाऊन पाहिल्यास अनेक नाविन्यपूर्ण व प्रेरणादायी माहिती आपल्याला मिळते. निसार्गाच्या आपल्या या हिरव्या डोळ्यातून मगच आपलं जंगल वाचन खर्‍या अर्थाने समृद्ध होत जात. जंगलात खर तर लहान मुल होऊन फिरण्यात अन जगण्यात एक वेगळा आनंद आहे. लहानपण देगा देवा, मनी वसतो गवा....! इयत्ता दहावीतल्या गव्यांच्या दर्शनाची आठवण म्हणूनच तर माझ्या मनात अजूनही ओलीच आहे.