10 दिवस लोटूनही ‘फनी’ग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीतच
   दिनांक :12-May-2019
-वीज, पाणीपुरवठा खंडित, संतप्त नागरिकांची निदर्शने
 
भुवनेश्वर, 
 
ओडिशातील किनारपट्टींच्या भागांना फनी चक्रीवादळाचा तडाखा बसल्याच्या घटनेला 10 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला, पण या भागांमधील जनजीवन अजूनही विस्कळीतच आहे. सरकारकडून अथक प्रयत्न केले जात असतानाही, अद्याप पाहिजे तसे पुनर्वसन कार्य पूर्ण झालेले नाही. वीज आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ववत झाला नसल्याने अनेक ठिकाणी संतप्त नागरिकांनी उग्र निदर्शने केली. नागरिकांचा रोष शांत करण्यासाठी आणि पूनर्वसन कार्याला गती देण्यासाठी चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पाच जिल्ह्यांमधील सरकारी कार्यालये शनिवारी आणि रविवारी देखील खुली ठेवण्यात आली होती.
 

 
 
ताशी 200 पेक्षा जास्त गतीने फनी चक्रीवादळ 3 मे रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. यात मृत्युमुखी पडलेल्यांची सं‘या 43 च्या घरात गेली आहे, तर कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची हानी झाली आहे. या घटनेला आज दहा दिवस पूर्ण झाले. चक्रीवादळग्रस्त भागांमधील अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये वीज वीजपुरवठा खंडीतच आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे 1.56 लाख विजेचे खांब उद्‌ध्वस्त झाले. भुवनेश्वरमध्ये संतप्त नागरिकांनी, शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी करीत, रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी भुवनेश्वर येथील केंद्रीय विद्युतपुरवठा केंद्रावर हल्ला केला. अशाच प्रकारच्या घटना इतर ठिकाणच्या वीज केंद्रांवरही घडल्या असून, या सर्वच भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
दरम्यान, 50 टक्के वीज ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याची माहिती मुख्य सचिव ए. पी. पधी यांनी दिली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर राज्यांतून मनुष्यबळ मागविण्यात आले आहे.