स्वतःची पारख करण्यासाठी आयपीएल ही एक आदर्श स्पर्धा : रोहित शर्मा

    दिनांक :12-May-2019
हैदराबाद,
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने वर्ल्डकपपूर्वी 'वर्कलोड मॅनेजमेंट'वरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी स्वतःची पारख करण्यासाठी आयपीएल ही एक आदर्श स्पर्धा आहे, असे तो म्हणाला.
 

 
आयपीएल फायनलपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. जवळपास दोन महिने चाललेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान 'वर्कलोड' संबंधीचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य संघातील खेळाडू हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांना दिले होते. खेळायचे की नाही ही वैयक्तिक बाब असून, खेळाडू त्यांचा निर्णय घेऊ शकतात,' असे रोहित म्हणाला.
बुमराहच्या बाबतीत सांगायचे झाले तर, त्याला सामने खेळायचे आहेत. कारण त्याला स्वतःला पारखून घ्यायचे आहे. विश्रांती हवी असल्यास घेऊ शकतो, असे त्याला आधीच सांगितले होते,' असंही रोहित म्हणाला. आयपीएलमधील सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय खेळाडूंचाच होता, असंही त्यानं स्पष्ट केले. हार्दिक पंड्या चांगलाच फार्मात आहे. तो खूप चांगला खेळत आहे. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या आत्मविश्वासावर सकारात्मक परिणाम होतो. लयीत येण्यासाठी आयपीएल एक चांगली स्पर्धा आहे. हार्दिक त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे रोहित म्हणाला.