आयएसचा उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची घोषणा
   दिनांक :12-May-2019
नवी दिल्ली,
नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेपासून जगाला असलेला धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, ही दहशतवादी संघटना आता काश्मीर खोऱ्यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात असून, भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा या संघटनेने केला आहे. तसेच शुक्रवारी काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ठार केलेला इशफाक अहमद सोफी हा दहशतवादीसुद्धा आयएसशी संबंधित होता, असा दावा या संघटनेने केला आहे.
 
 
 
इस्लामिक स्टेटच्यावतीने एक वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. त्यामध्ये विलाय ए हिंद म्हणजेच भारतीय प्रांताचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र त्यात जम्मू काश्मीरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. दहशतवादी संघटनेशी संबंधित काही लोकांना सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीवेळी या संदर्भातील माहिती दिली होती.
तसेच इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये तो आपल्या संघटनेचा प्रभाव असलेल्या क्षेत्रांचा उल्लेख करत असल्याचे दिसत होते. त्यामुळे इस्लामिक स्टेनने केलेल्या दाव्याबाबतची चिंता वाढली आहे. बगदादीच्या या व्हिडीओत ईस्टर संडे दिवशी श्रीलंकेत घडवून आणलेल्या स्फोटांचाही उल्लेख होता. त्यामुळे इस्लामिक स्टेटच्या कारवायांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सावध भूमिका घेतली असून, या संघटनेच्या प्रत्येक हालचालींवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष आहे.