वाराणसीत मोदींच्या मताधिक्याचीच चर्चा!
   दिनांक :12-May-2019
 वाराणसी: सपा आणि कॉंग्रेसने वाराणसीमध्ये दुबळे उमेदवार दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी किती मताधिक्याने जिंकतील, एवढीच चर्चा आहे. सर्वांनाच येथे मोदींच्या मताधिक्याची उत्सुकता आहे. प्रियांका वढेरा वाराणसीतून निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विरोधकांमधील उत्साहही ओसरला आहे.
वाराणसी शहरातील वातावरण मोदीमय झाले आहे. दुकानदार, रिक्षावाले, टॅक्सीवाले, तरुण इत्यादी सर्वच जण मोदींचे गुणगान गातात. बनारसवासीयांच्या मते, देशात मोदी यांच्याकडे काही तरी करून दाखवण्याची क्षमता आहे.
मोदींमुळे शहराचा विकास होत असल्याचे सर्वसामान्य वाराणसीकरांना वाटते. पूर्वी फक्त चार-पाच तास वीजपुरवठा होत असे. आता घराघरांत दिवसभर वीज असते. रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. गंगा नदी तुलनेत स्वच्छ झाली आहे. मोदी-योगी यांच्यामुळे वाराणसीचा विकास होत असल्याचे मोदीसमर्थक मतदारांचे म्हणणे आहे.
 

 
 
कॉंग्रेस उमेदवार अजय राय यांना समर्थन देणारे ‘आप’चे माजी प्रभारी संजीव सिंह यांनी मोदींच्या विरोधात काही मुद्दे वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केले. गंगा खरोखर स्वच्छ झाली असेल तर, मोदींनी गंगेत स्नान करण्याचे धाडस दाखवायला हवे होते. वाराणसीच्या विकासाच्या नावाखाली जुनी देवळे पाडली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
विरोधक कमकुवत असल्याने ते मोदींना आव्हान देण्यास असमर्थ आहेत. सपाने शालिनी यादव यांना उमेदवारी दिली आहे.
वाराणसी मतदारसंघात पहिल्यांदा मतदान करणारे तरुण हे मोदींचे संभाव्य मतदार आहेत. यादव आणि दलितांची मतेही मोदींना मिळण्याची खात्री भाजपाला आहे. त्यामुळे भाजपापुढे मोदींचे मताधिक्य वाढवण्याचे आव्हान आहे.
बुथ स्तरावरील कार्यकर्ता बेसावध राहू नये, याची दक्षता वाराणसीतील भाजपाच्या निवडणूक कार्यालयातून घेतली जात आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशातील भाजपाचे पदाधिकारी सहप्रभारी सुनील ओझा यांनी दिली.
घ(वृत्तसंस्था)