विरोधक संपल्यात जमा, पुन्हा रालोआच येणार
   दिनांक :12-May-2019
पंतप्रधान मोदी यांचा विश्वास 
  
 
तभा ऑनलाईन  
कुशिनगर, 
लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे भाजपासाठीच अनुकूल होते आणि आजचा सहावा टप्पाही विरोधकांना भूईसपाट करण्यासाठी कारणीभूत ठरला. विरोधक आता संपल्यात जमा असून, केंद्रात पुन्हा एकदा भाजपाप्रणीत रालोआचेच सरकार सत्तेत येणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे व्यक्त केला. 2014 प्रमाणेच जनता पुन्हा एकदा प्रभावी, सक्षम आणि प्रामाणिक सरकारसाठी मतदान करीत आहे. सहाव्या टप्प्यातील मतदारांचा उत्साह भ्रष्ट आणि महामिलावट करणार्‍या विरोधकांसाठी फार मोठी चपराक आहे, असे पंतप्रधानांनी उत्तरप्रदेशच्या कुशिनगर येथे आयोजित भव्य प्रचार सभेला संबोधित करताना सांगितले.
 
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा नेत्या मायावती यांनी एकत्रित मिळून मुख्यमंत्रिपदी जितकी वर्षे घालवली नसेल, त्यापेक्षा जास्त काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री राहिलो आहे. इतकी वर्षे मुख्यमंत्रिपदी राहूनही माझ्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग येऊ दिला नाही, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. अल्वर येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी मायावती यांच्या वक्तव्याचाही पंतप्रधानांनी समाचार घेतला. या घटनेवर नकाश्रू ढाळणे बंद करा, बलात्कारपीडित महिला दलित होती आणि तुम्हाला जर दलितांविषयी इतकी आपुलकी असती, तर राजस्थानमधील काँग्रेस  सरकारचा पािंठबा तुम्ही आतापर्यंत काढला असता, असा टोलाही त्यांनी हाणला.
 
अतिरेक्यांना मारल्याचे विरोधकांना दु:ख
काश्मीर खोर्‍यात अनेक अतिरेक्यांना आपल्या जवानांनी ठार केले, याचे काही लोकांनी याचा विरोध केला. ऐन निवडणुकीच्या काळात माझ्या सरकारने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई दल घुसविले आणि शेकडो अतिरेक्यांना ठार केले. सरकारचे हे यश विरोधक पचवू शकले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
 
काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी त्यांनी कोळसा घोटाळा केला, आम्ही सत्तेत आलो आणि आम्ही गरिबांना हक्काची घरे प्राप्त करून दिली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.