आसेगाव येथे शॉटसर्किटमुळे दुकानाला आग लाखोंचे नुकसान

    दिनांक :12-May-2019
 आसेगाव : मंगरूळनाथ तालुक्यातील आसेगाव येथील बसस्थानकापासून जवळच असलेल्या श्रीसाई इलेक्ट्रीकल या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
आसेगाव येथील गजानन उत्तरवार यांचे मुख्य रस्त्यावर यांचे श्रीसाई इलेक्ट्रीकल हे दुकान आहे. रविवारी उत्तरवार हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतांना दुकानाला आग लागल्याचे फोनवर कळाले. ते येईपर्यंत दुकान पूर्ण जळून खाक झाले होते. दुकानात इलेक्ट्रॉनिक वस्तू बरोबरच दुरुस्तीसाठी आलेल्या अनेक वस्तू होत्या. शेजारी राहणाऱ्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला व मंगरुळनाथ येथील अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते परंतु तोपर्यंत दुकानातील इलेक्ट्रिकलचे सामान पूर्णपणे जळून खाक झाले होते. वृत्त लिहेपर्यंत आसेगाव पोलिसात घटनेची नोंद झाली नव्हती.