मातृत्वाला कृतज्ञ नमन!; आज जागतिक मातृदिन
   दिनांक :12-May-2019
तभा ऑनलाईन 
नागपूर,
आज मे महिन्याचा दुसरा रविवार. जागतिक मातृदिन! मातृत्वाच्या स्तोत्राचे स्मरण करण्याचा, मातृत्वाला कृतज्ञ नमन करण्याचा दिवस. जगभरात साजरे केले जाणारे विविध दिवस हे विशिष्ट तारखेला असतात. संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना आदी जागतिक स्तरावरील अधिकृत संघटनांच्या आवाहनानुसार हे दिवस ठरलेले असतात. मात्र, मातृदिन मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारीच साजरा करण्यात येतो. 

 
 
का बरे मे महिन्याचा दुसरा रविवार?
मातृदिनाची औपचारिक सुरुवात ही अमेरिकेत झाली. अमेरिकेतील पश्चिम व्हर्जिनिया प्रांतात अॅना जार्व्हिस ही महिला आपल्या आईवर अत्यंत प्रेम करायची. ती सदैव आपल्या आईसोबतच राहात असे. तिच्या आईचा मृत्यू 1905 मध्ये झाला. आपल्या आईचा मृत्यू झाल्यावर ॲना जार्व्हिस हिने आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ मातृदिन साजरा करण्यासाठी चळवळच सुरू केली. ग्रॅफ्टन येथे तिच्या पुढाकाराने 1908मध्ये पहिला मातृदिन साजरा झाला. अॅना जार्व्हिस हिने केलेल्या प्रयत्नांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना तिच्या प्रयत्नांची दखल घ्यावी लागली. त्यांनी 1914मध्ये एक कायदा संमत केला. त्यानुसार, मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेत हा कायदा संमत झाल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये हा दिवस मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी साजरा करण्यात येऊ लागला. आजघडीस भारतासह जगभरातील सुमारे 97 देशांमध्ये मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा होतो. एवढेच नव्हे तर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध दिवशी हा दिवस साजरा केला जातो. बहुतांश देशांमध्ये मार्च आणि मे महिन्यांतच हा दिवस साजरा केला होतो. 

 
 
मातृदिन साजरा करण्याच्या पद्धती
मातृदिन साजरा करण्याची पद्धत ही व्यक्ती, संस्था आणि समाजानुरुप वेगवेगळी असल्याचे आढळून येते. काही संस्था या दिवसानिमित्त विशेष कार्यक‘मांचे आयोजन करतात. अगदी मातृत्वाची महती असलेल्या गाण्यांच्या कार्यक‘मांपासून तर, चर्चा, परिसंवाद, आरोग्य शिबिरे, मुलाखती आदी उपक‘मांचे आयोजन करण्यात येते. प्रेम व्यक्त करण्याची भावना ही अर्थातच प्रत्येकाच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते.
नाने केला व्यापारीकरणास विरोध
ज्या ॲना जार्व्हिसच्या पुढाकाराने मातृदिनाला मान्यता मिळाली तिनेच पुढे या दिनाला विरोध करायला सुरुवात केली, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील हॉलमार्क कंपनी! अमेरिकेत अधिकृतरीत्या मातृदिनाची घोषणा होताच, बाजारपेठेत हॉलमार्क कंपनीने शुभेच्छापत्रे आणलीत. आपल्या भावनांचे हे व्यापारीकरण होय, असे म्हणत अॅनाने विरोध सुरू केला. मी हा दिवस संवेदनांसाठी प्रारंभ केला असून, कुठल्याही कंपनीच्या नफ्यासाठी नाही, अशी भूमिका तिने घेतली. हस्तलिखित शुभेच्छापत्रांचा आग‘ह तिने लावून धरला. तिची दृष्टी आणि मानवी भावनांचे व्यापारीकरण आपल्याला आजही बघायला मिळते आहे.
महानायक अमिताभ यांचे गाणे
महानायक अमिताभ बच्चन यांनी मातृदिनाच्या पूर्वसंध्येस शनिवारी एक प्रेमळ आणि भावूक संदेश एका गाण्याच्या माध्यमातून दिला आहे. त्यांनी त्यांची आई तेजी बच्चन यांच्या आठवणीत हे गाणे गायले आहे. या गाण्याचे नाव ‘मॉं’, असे आहे. हे गाणे अमिताभ बच्चन यांनी यजत गर्ग यांच्यासोबत गायले आहे. अमिताभ यांनी या गाण्यातून आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या गाण्याचे बोल ‘मेरी रोटी की गोलाई मॉं, मेरे सच की सब सच्चाई मॉं....’ असे आहेत. या गाण्यात आईवरील प्रेम, तिचा संघर्ष व मुलांसाठी केलेला त्याग यांचे वर्णन आहे.