व्यापारातील मतभेद मिटवा अन्यथा जगावर नकारात्मक परिणाम होईल

    दिनांक :12-May-2019
- अमेरिका-चीनला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आवाहन
 
तभा ऑनलाईन 
पॅरिस,
अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वांत मोठा धोका आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिन लगार्ड यांनी केले आहे. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका संमेलनात लगार्ड यांनी सांगितले की, अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. या विषयावरील अफवामुळे दोन्ही देशांत कोणत्याही प्रकारे व्यापारी समझोता होण्याची शक्‍यता कमी झाली आहे.
 
फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनो ले मायरे यांनीही याबाबत चिंता व्यक्‍त करताना, आम्ही चीन आणि अमेरिका यांच्यातील सध्याच्या वाटाघाटींवर नजर ठेवून आहोत. दोन्ही देशांनी पारदर्शकता आणि बहुपक्षवादाच्या सिद्धांताचा सन्मान करायला हवा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर नकारात्मक परिणाम होईल, असे निर्णय घेण्यापासून दोन्ही देशांनी दूर राहायला हवे, असे मत व्यक्त केले. 
अमेरिकेने चीनवर आणखी आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन्ही देशांत पुन्हा व्यापार युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीनचे एक शिष्टमंडळ सध्या वॉशिंग्टनमध्ये वाटाघाटी करीत आहे. तथापि, त्याआधीच अमेरिकेने आयात शुल्कवाढीची घोषणा केली आहे. आपले शिष्टमंडळ अमेरिकेला असूनही अमेरिका निर्णय जाहीर करण्याची गडबड करीत असल्याचे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांत व्यापारातील तणाव वाढण्याची शकयता आहे.