खासगी कारचालकांना भाडं घ्यायला मान्यता
   दिनांक :12-May-2019
-सरकार बनवतेय नवा नियम
 
जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर आता त्याद्वारे तुमची अतिरिक्त कमाई सुरू होऊ शकते. कारण, सरकार परिवहन कायद्यात मोठा बदल करण्याचा विचार करत आहे. एका बातमीनुसार, ‘व्हेइकल पूलिंग’ योजनेचा केंद्र सरकार विचार करत आहे.
 

 
देशभरात खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, परिणामी ट्रॅफिक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस मोठी होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारडून खासगी गाड्यांचा वापर कमर्शियल ( व्यावसायिक ) कारणासाठी करता यावा म्हणून परमिट जारी करण्याचा विचार सुरू आहे. नीति आयोगाने यासाठी एक पॉलिसी तयार केली आहे. मात्र, ही सेवा सुरू करण्यासाठी कार मालकांना काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागेल. खासगी कारचालक दिवसाला 3 ते 4 फेऱ्याच कमर्शियल ट्रिपच्या करू शकतो, असा त्यात नियम असणार आहे.
प्रवाशांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी खासगी वाहनांसाठी नियमावली बनवली जाणार आहे. त्यासाठी खासगी वाहन चालकांना राज्य परिवहन विभागातील मान्यता प्राप्त समीक्षकाकडून KYC (know your customer)प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. समीक्षकाकडे वाहनाचा पूर्ण तपशील असेल जेणेकरुन कार मालक एका दिवसात तीन किंवा चार पेक्षा अधिक फेऱ्या मारु शकणार नाही, आणि नियम तोडल्यास तातडीने त्यावर कारवाई करता येणं शक्य होईल. याशिवाय खासगी कार मालकांना भाडं घेण्याआधी प्रवाशांचा विमाही उतरवावा लागेल. यासाठी सरकारकडून भाडं निश्चित केलं जाणार नाही, तर भाडं निश्चिती बाजारातील भावानुसार असेल असंही एका अधिकाऱ्याने सांगितलं.