#loksabhaelctions2019; आठ वाजेपर्यंत देशभरात ६२.२७ टक्के मतदान
   दिनांक :12-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली,
लोकसभा निवडणुकीच्या सात राज्यांतील एकूण ५९ मतदार संघांसाठी सहाव्या टप्प्याचे मतदान आज रविवारी होत आहे. उत्तर प्रदेशातील १४ जागांसह हरियाणातील १०, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ, दिल्लीतील सात आणि झारखंडमधील चार जागांसाठी चुरशीने मतदान पार पडणार आहे.
 
उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व १४ जागा पूर्वांचल प्रांतातील आहेत. ज्या मतदार संघात मतदान होत आहे, त्यात सुलतानपूर, प्रतापगड, फूलपूर, अलाहाबाद, आंबेडकर नगर, श्रावस्ती, डोमरियागंज, बस्ती, संत कबीर नगर, लालगंज, आझमगड, जौनपूर, मछलीशहर आणि भदोई या मतदार संघांचा समावेश आहे.
 
 
 
दिल्लीतील सातही जागांसाठी भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या शिला दीक्षित, भोजपुरी अभिनेते व प्रदेश भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, गायक हंसराज हंस, बॉक्सर विजेंदर सिंग यांचे भवितव्य पणास लागले आहे.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत देशभरात ६१.१४ टक्के मतदान झाले. तर ६ वाजेपर्यंत देशात ५९.७० टक्के मतदान झाले होते. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये 80.13 टक्‍के, दिल्‍लीत 55.44, हरियाणात 62.14 टक्‍के, उत्‍तर प्रदेशमध्ये 50.82 टक्‍के, बिहारमध्ये 55.04 टक्‍के, तर झारखंडमध्ये 64.46 टक्‍के आणि मध्य प्रदेशात 60.12 टक्‍के मतदान झाले.