...तरीही काँग्रेसचे भगव्या दहशतवादाचे पाप धुतले जाणार नाही : मोदी
   दिनांक :12-May-2019
तभा ऑनलाईन  
भोपाळ,
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरात ६ तासांत तब्ब्ल ४ रॅलींना संबोधित केले. यात त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातल्या जनसभांमधून काँग्रेस आणि सपा-बसपा महागठबंधनवर हल्ला चढविला. काँग्रेस नेत्यांनी कितीही यज्ञ केले, जानवं दाखवलं, इतके च काय पोलिसांनाही भगवी वस्त्रं परिधान करण्यास लावली, तरीही भगव्या दहशतवाद्यांचे त्यांचे पाप धुतले जाणार नाही, असा घणाघाती शब्दांचा प्रहार मोदींनी काँग्रेसवर केला. जर मायावतींना दलित मुलींची इतकीच चिंता असेल, तर त्यांनी अलवर प्रकरणानंतर राजस्थान सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, असे आव्हान पंतप्रधानांनी यावेळी दिले. 
 
 
 
'काँग्रेसने हिंदू शब्द दहशतवादाशी जोडून महान परंपरेचा अपमान केला. मतपेढीच्या राजकारणासाठी गंभीर कट रचण्यात आला. मात्र आता त्यांना प्रत्युत्तर मिळते आहे,' असे मोदी म्हणाले. काँग्रेस नेते सॅम पित्रोदांच्या 1984 मध्ये जे झालं ते झालं, या दंगलीवरील विधानाचाही मोदींनी पुरेपूर समाचार घेतला. 'खंडवाचे सुपुत्र असलेल्या किशोर कुमार यांच्या गाण्यांवर काँग्रेसने आणीबाणीदरम्यान बंदी आणली. आता त्यांना याबद्दल विचारले, तर म्हणतील जे झालं ते झालं. वायूगळती प्रकरणातल्या आरोपीला सरकारी विमानाने का पळवले, त्यावरदेखील काँग्रेस हेच उत्तर देईल असे मोदी यावेळी म्हणाले. 
 
पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर निर्दोष व्यक्तींना तुरुंगात टाकले जायचे, असा गंभीर आरोप मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर येथील जनसभेत लगावला. या सभेत मोदींनी आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा संदर्भ दिला. 'काश्मीरमध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचे आज सकाळीच समजले. आता काही लोकांचा प्रश्न आहे की मतदान सुरू असताना मोदींनी दहशतवाद्यांना का मारले. दहशतवाद्यांना मारण्याआधीही जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काश्मीरमध्ये सतत स्वच्छता अभियान सुरू असते. दर दोन-तीन दिवसांनी स्वच्छता होत असते. हे स्वच्छता अभियान राबवणे माझे काम आहे, अशा शब्दांत मोदींनी दहशतवाद्यांवरील कारवाईचा उल्लेख केला.