‘दंतेश्वरी लडाके’ करणार नक्षलवाद्यांचा खात्मा!
   दिनांक :13-May-2019
आता नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शरण आलेल्या नक्षलवाद्यांचाच वापर केला जाणार आहे. त्यासाठी छत्तीसगड सरकारने ‘दंतेश्वरी लडाके’ नावाचे पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक तयार केले आहे. तसेच येथील नक्षलग्रस्त बस्तर आणि दंतेवाडा भागात हे पथक तैनात करण्यात आले आहे.
 

 
 
‘दंतेश्वरी लडाके’ पथकात ३० नक्षलविरोधी महिला कमांडो आहेत. यामध्ये १० अशा महिला आहेत ज्यांनी हिंसक नक्षलवादी चळवळ सोडून आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांना या नक्षलविरोधी पथकात अधिकृतरित्या समावून घेण्यात आले आहे.
 
 
बस्तरचे पोलीस महानिरिक्षक विवेकानंद सिन्हा म्हणाले, ‘दंतेश्वरी लडाके’ पथक हे महिला सक्षमीकरणाचे अनोखे उदाहरण आहे. याद्वारे महिला पोलीस कमांडो आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने काम करीत आहेत. त्या उत्कृष्ट पद्धतीने काम करतील असा मला विश्वास आहे.
 
या पथकात ३० महिलांचा समावेश असून पोलीस उपाधिक्षक दिनेश्वरी नाद यांच्या नेतृत्वाखाली ते तयार करण्यात आले आहे. दरम्यान, दंतेश्वरी फायटर्स आणि पोलीस अधिकारी या दोघांनाही जंगलातील युद्धासाठी व्यापक प्रशिक्षण देण्यात आले आहे.