गृहमंत्रालयाकडून इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी रद्द
   दिनांक :13-May-2019
-विदेशी देणग्यांबाबतच्या नियमांचे उल्लंघन 
 
 
तभा ऑनलाईन टीम   
नवी दिल्ली, 
विदेशी देणग्यांबाबत असलेल्या नियमांचे कथित उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय गृहमंत्रालयाने बंगळुरू येथील स्वयंसेवी संघटना इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी रद्द केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी आज सोमवारी दिली. सर्वच स्वयंसेवी संघटनांना विदेशातून निधी उभारण्यासाठी विदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत (एफसीआरए) नोंदणी करणे अनिवार्य आहे. कित्येक वेळा स्मरणपत्र देऊनही इन्फोसिस फाऊंडेशनने मागील सहा वर्षांतील विदेशी निधीतून झालेले उत्पन्न आणि खर्चाचा तपशील सादर न केल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने या संघटनेला मागील वर्षी कारणे दाखवा नोटिस बजावली होती, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.
 
इन्फोसिसने मागील काही वर्षांपासून विदेशी निधीतून प्राप्त झालेले उत्पन्न आणि खर्चाचा तपशील सादर न केल्याने या संघटनेची नोंदणी रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एफसीआरएच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे, नोंदणी केलेल्या संस्थांनी आपला वार्षिक अहवाल स्कॅन केलेला उत्पन्न आणि खर्च, आलेला निधी, झालेला खर्च, ताळेबंद संपलेल्या आर्थिक वर्षानंतर नऊ महिन्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ऑनलाईन सादर करणे गरजेचे आहे. ज्या संघटनांना विशिष्ट वर्षात विदेशी निधी प्राप्त झाला नसेल, त्यांनी देखील संबंधित आर्थिक वर्षाचा त्या आशयाचा परतावा सादर करणे आवश्यक असल्याचे एफसीआरएच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
 
आम्ही केलेल्या विनंतीवरूनच एफसीआरएमधून आमच्या संघटनेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. 2016 मध्ये एफसीआरए कायद्यात झालेल्या बदलाप्रमाणे आमची संघटना या कायद्याच्या अखत्यारित येत नसल्याने आम्ही ही विनंती केली होती. मंत्रालयाने आमच्या विनंतीचा मान ठेवून नोंदणी रद्द केल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया इन्फोसिस फाऊंडेशनच्या कंपनी विपणन आणि दूरसंचार विभागाचे अधिकारी ऋषि बासू यांनी व्यक्त केली.