...तर मोदी दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेतील का?
   दिनांक :13-May-2019
- मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली
 
 
 
बंगळुरू, 
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांची जीभ वारंवार घसरताना दिसत आहे. वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश झाला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० पेक्षा कमी जागा मिळण्याचा पंतप्रधान मोदींचा अंदाज चुकला, तर ते दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेणार का, असा सवाल खर्गे यांनी विचारला. कर्नाटकातील चिंचोळी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार सुभाष राठोड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
 
मोदी जिथे जातात, तिथे बोलतात की लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागाही मिळणार नाही. तुमच्यापैकी कोणाला तरी असे वाटते का, जर आम्हाला ४० जागा मिळाल्या, तर मोदी दिल्लीच्या विजय चौकात फाशी घेतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे २०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या होत्या.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी मोदींची तुलना जर्मनीचा हुकूमशाह हिटलरशी केली होती. मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले होते की, हिटलरने ज्याप्रमाणे जर्मनीत हुकूमशाही आणली, तसेच काहिसे मोदींना भारतात करायचे आहे. संविधान धोक्यात आहे आणि आपल्याला भाजपाच्या या प्रयत्नांना खीळ घालायला हवी.
 
खर्गेंनी माफी मागावी : भाजपा
भाजपाचे ज्येष्ठ नेत्या आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी या वक्तव्याप्रकरणी खर्गे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ज्येष्ठ नेत्याकडून अशा अशोभनीय विधानाची अपेक्षा नव्हती, असे त्या म्हणाल्या.
 
उमेश जाधवांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक
विद्यमान उमेदवार उमेश जाधव यांच्या राजीनाम्यानंतर िंचचोळी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. उमेश जाधव यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आता ते गुलबर्गामधून लोकमसभा निवडणूक लढवत आहेत.