गरज ऑनलाईन सुरक्षेची

    दिनांक :13-May-2019
आजकाल तंत्रज्ञानानामुळे अनेक गोेष्टी सोप्या झाल्या असल्या तरी धोकेही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. विशेषकरून आर्थिक क्षेत्रात ऑनलाईन माध्यमांमधून बरेच गैरप्रकार घडत असतात. विमा क्षेत्रातही तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. विमा पॉलिसी घेण्यापासून तिच्या नूतनीकरणापर्यंत अनेक गोष्टी ऑनलाईन केल्या जातात.
 
‘फिनटेक’ या शब्दाप्रमाणे विमा क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाच्या वापराला ‘इन्शुअरटेक’ असं म्हटलं जातं. मात्र तंत्रज्ञानामुळे विमा क्षेत्रात निर्माण झालेल्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ऑनलाईन माहिती सहज चोरली जाऊ शकते. त्यामुळे विम्याचे ऑनलाईन व्यवहार सुरक्षितपणे करायला हवे. सार्वजनिक वायफाय सेवेचा वापर टाळावा. तसंच तुमच्या वैयक्तिक कॉम्प्युटरवरूनच हे व्यवहार करायला हवे.
 
 
 
 
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीला मान्यता देऊ नये. ऑनलाईन व्यवहार करताना आपल्यापुढे नियम व अटींची यादी येते. ही यादी न वाचताच आपण मान्यता देतो. मात्र आपला महत्त्वाचा डाटा दुसरीकडे कुठे वापरला जाऊ नये यासाठी हे नियम नीट वाचून घ्या. नियम व अटी हायपर लिंकच्या माध्यमातून शेअर केल्या जाऊ शकतात. विमा घेण्याआधी त्यावर बारकाईने नजर टाका. तुमचा डाटा कोणला कधी शेअर केला जाणार आहे हे नमूद केलेलं असतं.
 
हा डाटा चुकीच्या हातांमध्ये पडणार नाही याची आपणच काळजी घ्यायला हवी. तंत्रज्ञानाशी संंबंधित काही गोष्टी कळत नसतील तर विमा कंपन्यांची मदत घ्यायला कचरू नका. विमा कंपन्यांनीही ग्राहकांच्या जागरूकतेसाठी पुढाकार घ्यायला हवा. विमा क्षेत्र कात टाकत असताना ते अधिकाधिक सुरक्षित कसं होईल याचे प्रयत्न होणं गरजेचं आहे.