पाकिस्तानला नाणेनिधीकडून ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज
   दिनांक :13-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
इस्लामाबाद,
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तीन वर्षांमध्ये पाकिस्तानला ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार असून, याला अद्याप नाणेनिधीच्या संचालक मंडळाची मंडळाची मंजुरी मिळालेली नाही.
 
 
 
सद्यस्थितीत पाकिस्तानची व्यापारी तूट २० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात ५० टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आर्थिक सल्लागार डॉ. अब्दुल हाफिझ शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
पाकिस्तानी सरकारने महागाई, कर्जाचा बोजा आणि धिम्या गतीने वाढणारा विकास दर अशा समस्यांशी सामना करण्यासाठी कर्जाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा स्वीकार केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिल्याचे वृत्त पाकिस्तानातील डॉन न्यूजने आहे. पाकिस्तानला नाणेनिधीकडून ८ अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळण्याची अपेक्षा होती, पण आता पाकिस्तानला तीन वर्षांसाठी ६ अब्ज डॉलर्सचेच कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या अटी पाळाव्या लागणार आहेत. कर्जाच्या बोज्याखाली सापडलेल्या पाकिस्तानला पूर्वीच्या कर्जाचे हप्ते फेडणेही कठीण झाले होते.