कर्मचार्‍यांसाठी करबचतीचे पर्याय

    दिनांक :13-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
नोकरदारवर्गासाठी करबचतीचे अनेक पर्याय आहेत. करपात्र वेतन कमी करून तुम्ही बरीच करबचत करू शकता. आयकर कायद्यातल्या कलम 80 सी अंतर्गत मिळणार्‍या करबचतीच्या लाभांची आपल्याला माहिती असते. मात्र या व्यतिरिक्तही विविध माध्यमांमधून तुम्ही करात सवलत मिळवू शकता. करबचतीच्या फारशा ज्ञात नसलेल्या पर्यायांविषयी...
 
 
 
 
कंपनीच्या मालकीची गाडी कार्यालयीन कामासाठी वापरणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याला इंधन भत्ता किंवा वाहन भत्ता दिला जातो. या भत्त्यामुळे इंधन खर्च, गाडीची दुरूस्ती, ड्रायव्हरचा पगार यासाठी होणारा खर्च तुम्हाला करात सवलत मिळवून देतो. खिशातून झालेला हा खर्च तुम्ही दर महिन्याला कंपनीकडून मागून घेत असाल तर एका आर्थिक वर्षात तुम्ही अकरा हजार रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता. ज्ञानात भर पडावी म्हणून कर्मचार्‍यांना आपल्या विषयाशी संबंधित पुस्तकं, मासिकं वाचावी लागतात. म्हणूनच सर्व कर्मचार्‍यांना पुस्तकं आणि मासिकं खरेदी करण्यासाठी भत्ता दिला जातो. या रकमेतून कर्मचारी पुस्तकं, वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं तसंच इतर उपयुक्त साहित्य खरेदी करू शकतात. याचा खर्च कंपनीकडून मागून घेऊ शकतात. यावर करात पूर्ण सवलत मिळू शकते.
 
-advt-
 
संशोधन कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांना संशोधन भत्ता दिला जातो. कर्मचार्‍याच्या संशोधन प्रकल्पाशी संबंधित सर्व खर्च कंपनी उचलते आणि कर्मचारी करात सवलत मिळवू शकतात. काही कर्मचारी सहाय्यक किंवा मदतनीस ठेऊ शकतात. त्यांच्या पगारासाठी कंपनीकडून भत्ता मागता येतो आणि त्या माध्यमातून करात सवलतही मिळते. कर्मचारी बरेचदा स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करतात. हा खर्च कंपनीकडून मागून घेतला तर तुम्ही बराच कर वाचवू शकता. त्यामुळे कलम 80 सी पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे.