IPL वर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक; अंतिम सामन्यावर कोटयवधीचा सट्टा

    दिनांक :13-May-2019
सट्टा अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा 

 
 
अकोला,
जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतीम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स तसेच मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यांवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा सुरू असताना छापा टाकून दोन बड्या सट्टा माफियांना अटक केली. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
मलकापूर परिसरातील कोठारी याच्या डुप्लेक्स मध्ये मोंटू उर्फ कल्पेश स्वरूपचंद अग्रवाल रा. गुलजारपूरा जुने शहर आणि संजय पुरुषोत्तम शर्मा रा तुकाराम चोक हे दोन बडे सट्टा माफिया आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू असताना लाखो रुपयांचा सट्टा बाजार चालवीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांना मिळाली. त्यांच्या पथकाने मलकापूर परिसरात असलेल्या कोठारी यांच्या डुपलेक्स वर पाळत ठेवली. त्यानंतर खात्री कळताच छापा टाकून दोन्ही सट्टा माफियांना ताब्यात घेतले.
 
त्यांच्याकडून ७० हजार रुपये किमतीचे मोबाईल, ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, ४० हजार रुपये किमतीचा एक टीव्ही, कॅलकुलेटर, रिमोट तसेच सट्टा लावण्यासाठी असलेली एक विशेष मशीन विशेष पथकाने जप्त केली आहे. पोलिसांनी या बड्या सट्टा माफियांकडून तब्बल तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली आहे. विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर तिसऱ्याच दिवशी आयपीएलच्या सामन्यांवर सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सट्ट्यावर कारवाई केल्याने सट्टा माफियांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी दोन्ही सट्टा माफियांविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर यांनी केली.