'ममता बॅनर्जींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अटक करून दाखवावी'
   दिनांक :13-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
जॉयनगर,
पश्चिम बंगालमधील जॉयनगर लोकसभा मतदारसंघात एका प्रचारसभेला संबोधित करताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना थेट आव्हान दिले आहे. अमित शाह यांनी या प्रचारसभेत 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हे आव्हान दिले. या रॅलीनंतर मी कोलकात्याला जात आहे. ममता बॅनर्जींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अटक करून दाखवावे, असे शाह यावेळी म्हणाले.
 
 
 
''आज बंगालमध्ये माझ्या तीन सभा होत्या. मला जाधवपूर येथेही सभा घ्यायची होती. मात्र या मतदारसंघातून ममता बॅनर्जींचे भाचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपाला दिलेल्या सभेची परवानगी रद्द केली. आता आम्हाला बोलू द्या अथवा न बोलू द्या. लोकसभा निवडणुकीत टीएमसीला पराभूत करण्याचे बंगालमधील जनतेने निश्चित केले आहे.'' असेही शाह यावेळी म्हणाले.
 
 
 
 
यावेळी अमित शाह यांनी ममता बॅनर्जींच्या भाच्यावरही टीका केली. ममता बॅनर्जीं यांनी आपल्या भाच्यासोबत मिळून सिंडिकेट्स बनवले आहे. इथे लोकांकडून विनाकारण कर वसूल केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी भाचा कर वसूल करत आहेत.
 
 
 
तसेच शाह यांनी बंगालमधील दुर्गा पूजेवरूनही ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ''दुर्गा पूजा ही बंगालची ओळख आहे. पण ममता बॅनर्जी यांनी या दुर्गापूजेवरही निर्बंध आणले. सरस्वती पूजा केली तर ममता बॅनर्जींचे गुंड मारामारी करतात. श्रीराम बोलू शकत नाही कारण ममता बॅनर्जींना गुंडांची मते हवी आहेत. बंगालमध्ये भाजपाला २३ लोकसभेच्या जागा मिळाल्या तर इथे पुन्हा एकदा सन्मानाने दुर्गापूजा सुरू होईलस असेही शाह यांनी सांगितले.