राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरेचा अपघातात मृत्यू

    दिनांक :13-May-2019
ठाणे: राष्ट्रीय स्तरावरील कॅरमपटू असलेली  कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा रविवारी डंपरने उडविल्याने जागीच मृत्यू झाला. डोंबिवलीच्या पलावा सिटी सर्कल येथे हा अपघात घडला असून तिच्या निधनामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 तिच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी डोंबिवलीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. नेहमी हसतमुख व मृदुभाषी असलेल्या जान्हवीला अंतिम निरोप देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड व मुंबईतील अनेक कॅरम खेळाडू व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. जान्हवीने २०१५ साली राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत जुनिअर राज्य विजेतेपद पटकावून खेळाची सुरुवात केली होती. सब-जुनिअर व जुनिअर राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. अवघ्या २० वर्षाच्या जान्हवीने नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांतील युवा गटात कांस्य पदक पटकाविले होते. अलिकडे ती सीनियर गटातही चांगली कामगिरी करत असल्याने भविष्यात महाराष्ट्राला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या.