पाच तालुक्यातील सरपंचांशी मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद

    दिनांक :13-May-2019
तक्रारी निकालात काढून उपाययोजना करण्याचे निर्देश
 
मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. त्यांनी या पाच तालुक्यातील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधल्याबद्दल सरपंच यांनी आनंद व्यक्त केला असून, गावातील दुष्काळाच्या संदर्भातील समस्या लगेच सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑडिओ ब्रीज सिस्टीम’मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेशी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. आज टंचाई जाणवणार्‍या भागातील नेमकी परिस्थिती काय आहे, प्रशासन कुठे मागे आहे, समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल, याबाबत थेट सरपंचांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला.
 

 
 
गावागावातील नळ योजना योजनेसंदर्भातील समस्या पाण्याचे स्त्रोत असणार्‍या नद्यांची समस्या, विहिरी, इंधन विहिरींची समस्या, तसेच जिल्ह्यामध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याची समस्या, याबाबत सरपंचांनी आपले मत निर्भयपणे या संवादातून मांडले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, चिमूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई पुढे आली आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा खंडित आहे. जिल्ह्यांमध्ये आजमितीला एकही टँकर सुरू नाही. तथापि, पाईपलाईन फुटणे, नळ योजनेच्या विहिरीला पाणी नसणे, वीज देयके प्रलंबीत असणे, जुन्या पाणी पुरवठा योजनेचे पुनर्जीवन करणे, रोजगार हमीच्या कामाची सुरुवात करणे आदी समस्या यावेळी सरपंचांनी मांडल्या.
या विशेष बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, मनपा आयुक्त संजय काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असणारे अभियंते चंद्रपूर मुख्यालयात तर तालुक्याच्या ठिकाणी अन्य अधिकारी ऑडिओ ब्रीज सिस्टीममार्फत जोडले गेले होते. या सर्व अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. चंद्रपूरमध्ये जुन्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. तिथे टँकरने पाणी पुरवठा करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाच्या सूचना आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे. रोहयो कामांना 3 दिवसात मंजूरी द्यावी, पाणी पुरवठा योजनांची 1.63 कोटीची वीज देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील थकित वीज बिल भरण्यात येऊन योजना पूर्ववत सुरु करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 5 तालुक्यातील 760 गावातील 1 लाख 34 हजार 362 शेतकर्‍यांना 41.37 कोटी इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 49 हजार 726 शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसानभरपाई पोटी 4.85 कोटी इतकी रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी 54.69 लाख इतकी रक्कम 547 पात्र शेतकर्‍यांना अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1.91 लाख शेतकर्‍यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी 36 हजार 313 शेतकर्‍यांना 2 हजार रुपये याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी 7.26 कोटीची रक्कम अर्थसहाय्य म्हणून देण्यात आली आहे. उर्वरित शेतकर्‍यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
जिल्ह्यात जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत, त्यातून रोजगार, लोकोपयोगी कामे आणि मत्ता निर्माण होईल. आवश्यकतेनुसार जिल्ह्यात टँकर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घ्यावा, अशा सूचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालून रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, माजी मालगुजारी तलावासाठी निधी दिला आहे. आवश्यकतेनुसार यातून कामे करावीत, पाणी पुरवठा योजनेकडे लक्ष द्यावे, जीवन प्राधिकरनाणे जुन्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करून पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू कराव्यात, अशा सूचना केल्या.
 
यावेळी काही सरपंचांनी कुशल कामाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली. रोहयोंतर्गत करावयाच्या कुशल कामाचे पैसे लवकरच मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशा योजनांकडे जातीने लक्ष द्यावे तसेच ज्या सरपंचांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, समस्या मांडल्या आहेत, त्यांच्या समस्या तातडीने सोडून अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले. ज्या पाणी पुरवठा योजनांचे वीज देयक भरले नाही म्हणून त्या बंद पडल्या आहेत. त्या योजनांचे देयक जिल्हाधिकारी यांनी त्वरित भरावे व योजना सुरु कराव्यात, असे स्पष्ट निर्देशही यावेळी दिले.
 
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर डॉ. कुणाल खेमनार यांनी उपस्थित वेगवेगळ्या या योजनांसाठी काम करणार्‍या अभियंत्यांना, अधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. तसेच यासंदर्भातील आढावा लवकरच घेण्याचे निर्देशित केले आहे.