...तर भारताशिवाय इतर कुणालाही एफ-21 विकणार नाही
   दिनांक :13-May-2019
- अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिनची भूमिका
 
नवी दिल्ली, 
 
भारतीय हवाई दलाने एफ-21 या श्रेणीतील 114 लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव आमच्याकडे सादर केल्यास, अलीकडेच उत्पादन करण्यात आलेली ही अत्याधुनिक विमाने आम्ही इतर कोणत्याही देशाला विकणार नाही, अशी भूमिका अमेरिकन हवाई क्षेत्रातील आघाडीच्या लॉकहीड मार्टिन या कंपनीने आज सोमवारी विशद केली आहे.
 

 
 
लॉकहीड मार्टिनच्या डावपेच, व्यवसाय आणि विकास विभागाचे उपाध्यक्ष विवेक लल्ला यांनी याबाबतची माहिती दिली. भारताने हे कंत्राट जिंकल्यास हा देशही कंपनीच्या जागतिक लढाऊ व्यवस्थेत सहभागी होईल, असे त्यांनी सांगितले. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
 
भारतातील 60 हवाई केंद्रांमधून सहजपणे उड्डाण घेऊ शकेल, असेच या विमानांचे प्रारूप तयार करण्यात आले आहे. या लढाऊ विमानांमध्ये अद्ययावत इंजीन, स्वयंचलित युद्धयंत्रणा आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमताही आहे. आम्ही अद्यापही विमाने जगातील कोणत्याही देशाला विकलेली नाही. अनेक देशांमध्ये या विमानांसाठी स्पर्धा सुरू आहे. या स्थितीतही आम्ही पहिले प्राधान्य भारताला देत आहोत आणि ही फार महत्त्वाची बाब आहे. आजच्या स्थितीत भारतालाही या विमानांची सर्वाधिक गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातच भारतीय हवाई दलाने 114 एफ-21 लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी विनंती निविदा जारी केल्या होत्या. हा संपूर्ण व्यवहार सुमारे 1800 कोटी डॉलर्सचा आहे.