प्रेमसंबंधातून युवकाची निर्घूण हत्या
   दिनांक :13-May-2019
घुग्गुस: प्रेमसंबधातून घुग्घूस येथील एका युवकाची दगडाने ठेचून निर्घूण हत्या करण्यात आली. ही घटना रविवार, 12 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. योगेश प्रकाश जाधव (23) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी प्रभुदास वेंकटी दुर्गे व क्रिष्णा प्रभुदास दुर्गे (रा. घुग्घूस) यांंनी रात्रीच्या सुमारास घुग्घूस पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
 घुग्घूस येथील एका युवतीशी योगेशचे दोन वर्षापासून प्रेमसंबध होते. दरम्यान, रविवारी दुपारपासून योगेश बेपत्ता असल्याची पोस्ट त्यांच्या एका मित्राने सोशल मिडियावर टाकली होती. सायंकाळी योगेशच्या कुटुंबियांनी घुग्घूस पोलिस ठाणे गाठून योगेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिस तपास करीत असतानाच, युवतीचे वडील प्रभुदास वेंकटी दुर्गे व भाऊ क्रिष्णा प्रभुदास दुर्गे (रा. घुग्घूस) यांनी रात्री घुग्घूस पोलिस ठाण्यात येऊन आत्मसमर्पण केले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील निलजई कोळसा खाणीजवळ दगडाने ठेचून योगेशची हत्या केल्याची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली.
घटनास्थळ शिरपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असल्याने घुग्घूस पोलिसांनी आरोपींना शिरपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. शिरपूर पोलिसांनी कलम 302, 201 (34) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली. सोमवारी दुपारच्या सुमारास योगेशच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी करून घुग्घूस येथे आणण्यात आला. त्यानंतर हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.