स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता : कमल हसन
   दिनांक :13-May-2019
अर्वाकुरची,
नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता अस विधान अभिनेता कमल हसन यांनी केले आहे. तामिळनाडू येथील हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना अभिनेता कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. अर्वाकुरची येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
 

 
अर्वाकुरची येथे येत्या 19 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी कमल हसन यांच्या राजकीय पक्षाचा उमेदवार उभा आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी कमल हसन अर्वाकुरची येथे आले होते. त्यावेळी बोलताना कमल हसन म्हणाले की, पहिला हिंदूदहशतवादी नथुराम गोडसे होता. या ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळे मी हे बोलत नाही तर माझ्यासमोर महात्मा गांधी यांचा पुतळा आहे त्याच्यासमोर उभं राहून मी हे सांगतोय.
 
 
स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. त्याचं नाव नथुराम गोडसे होतं. त्याच्यापासून दहशतवाद सुरु झाला. मी गांधींचा चाहता आहे मी त्यांच्या हत्येचा न्याय मागण्यासाठी आलो आहे. मी खरा भारतीय आहे. आणि कोणत्याही खऱ्या भारतीयाची देशात शांती आणि देशात समानता राखण्याची इच्छा असते असं यावेळी कमल हसन यांनी सांगितले. तसेच कोणताही खरा भारतीय नेहमी देशाचा झेंडा म्हणून तिरंग्याला पसंती देतो. आणि कायम देशाचा झेंडा तिरंगा राहील अशी त्याची इच्छा आहे असंही त्यांनी सांगितले.