दिग्विजयसिहांनी पाप केले; पंतप्रधान मोदी यांचा हल्ला
   दिनांक :13-May-2019
रतलाम, 
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्पात मतदार यादीत नाव असतानाही, काँग्रेस भोपाळ येथील उमेदवार दिग्विजयसिंह यांनी मतदान न करून, फार मोठे पाप केले आहे, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी येथे चढविला.
 
रविवारी सहाव्या टप्प्याचे मतदान घेण्यात आले होते.दिग्विजयसिंह यांचे नाव त्यांच्या राघोगड या पारंपरिक गृहजिल्ह्यात असतानाही, ते मतदान करण्यासाठी गेले नव्हते. व्यस्त कार्यक्रमांमुळे मला वेळच मिळाला नाही, असे कारण त्यांनी पुढे केले होते.
 
हाच धागा पकडून पंतप्रधान मोदी यांनी, येथे आयोजित भव्य प्रचार सभेत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत आहे. मोठ्या संख्येत लोक मतदान करीत असताना, स्वत: निवडणूक लढत असलेले दिग्विजयसिंह यांनी मतदान न करून, मोठे पाप केले आहे, असा आरोप मोदी यांनी केला.
 
 
 
भोपाळमध्ये तुम्ही मतदारांकडे स्वत:साठी मत मागत होता, कारण तुम्हाला तुमचा पराभव दिसू लागला आहे. माझे नाव देखील अहमदाबाद येथील मतदारयादीत आहे आणि मी सुद्धा निवडणूक प्रचारात व्यस्त होतो, पण लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढला आणि तिथे जाऊन मतदानाचा हक्क पार पाडला, असे मोदी यांनी स्पष्ट केले.