रमजानच्या काळात पहाटे मतदान नाहीच; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका
   दिनांक :13-May-2019
मुस्लिमांच्या पवित्र रमजानच्या महिन्यांत पहाटे पाच वाजता मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी (दि.१३) फेटाळून लावली. मतदानाची वेळ निश्चित करणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. यासाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ पुरेशी आहे. सकाळी सात वाजता अधिक तापमान नसते, असे याचिका फेटाळताना कोर्टाने म्हटले आहे.
 
वकील निजामुद्दीन पाशा यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली होती. यापूर्वीच निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळलेली असतानाही आयोगाच्या या निर्णयाला त्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. याचिकेत म्हटले की, रमजानच्या काळात मुस्लिमांना जास्त त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. यापूर्वी निवडणूक आयोगाने रमजानच्या काळात मतदान सकाळी सात वाजण्याऐवजी पहाटे चार वाजता सुरु करण्याची मागणी फेटाळून लावली होती. निवडणूक आयोगाने याप्रकरणी म्हटले होते की, आयोगाला पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानाच्या निश्चित वेळेत बदल करणे शक्य नाही.