शाळांचा प्राधान्यक्रम आजपासून

    दिनांक :13-May-2019
 
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रिया
 
पुणे: राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याकरिता उमेदवारांना सोमवारपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागातील 1 लाख 23 हजार उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठी पोर्टलवर नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांनी बिदूंनामावलीची तपासणी पूर्ण करून पोर्टलवर जाहिराती अपलोड केल्या आहेत. यावरून एकूण 12 हजार शिक्षकांच्या जागा भरतीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
 
 
 
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका यामुळे भरतीप्रक्रियेत अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून मंदावली आहे. उमेदवारांना पोर्टलवर माहिती अपडेट करण्यासाठी अनेकदा संधी देण्यात आली होती. या कालावधीत बहुसंख्य उमेदवारांनी संधीचा फायदा घेतला. उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू ठेवले होते. यासाठी 6 मेपासून पोर्टलवरील नोंदणीच्या सर्व सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता संगणक प्रणाली तयार झाली असून ती लवकरच पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.