जनतेचे प्रश्न घेऊन निवडणूक लढली, आता लोकांचा निर्णय मान्य करू
   दिनांक :13-May-2019
 नवी दिल्ली: जनतेशी निगडीत असलेले प्रश्न मांडून आम्ही यावेळची लोकसभेची निवडणूक लढवली आहे. लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते. त्यामुळे जनता जो कौल देईल तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे व्यक्त केली. नवी दिल्लीस्थित औरंगजेब लेन येथील शाळेत मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
 

 
 
याप्रसंगी त्यांच्यासोबत दिल्लीतील कॉंग्रेसचे एक उमेदवार व ज्येष्ठ नेते अजय माकन होते. राहुल गांधी म्हणाले की, ही निवडणूक आम्ही जनतेशी निगडीत असलेल्या बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी तसेच भ्रष्टाचार आदी विविध मुद्यांवर लढवली. या निवडणुकीत चांगली लढाई झाली. मोदींनी ही लढाई द्वेषाने लढली तर आम्ही प्रेमाने लढा दिला. आता प्रेमाचाच विजय होईल, असा मला विश्वास आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी संताप आणि द्वेषाने ओतप्रोत भरलेले असून त्याच मनोभूमिकेतून ते आमच्यावर सतत टीका करीत असतात. पण आम्ही त्यांच्या मत्सराचे उत्तर प्रेमानेच देत राहू, असे राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले होते. मोदींना संताप अनावर झाल्याने ते माझे वडील, आजी व आजोबांवर टीका करतात. ते मत्सर पसरवितात. मात्र, मी त्यांना प्रेमािंलगन देऊन प्रेमाचा प्रसार करतो, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.