दक्षिण आफ्रिकेचा रबाडा तंदुरुस्त, विश्वचषकात खेळणार

    दिनांक :13-May-2019
जोहान्सबर्ग, 
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा तंदुरुस्त असून, तो विश्वचषक स्पर्धेत 5 जूनला भारताच्या विरुद्ध होणार्‍या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. तो तंदुरुस्त असल्याची माहिती दक्षिण  आफ्रिकेच्या संघाचे वैद्यकीय अधिकारी मोहम्मद मुसाजी यांनी दिली.
 
 
आयपीएल सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटलकडून खेळताना रबाडाने सर्वाधिक 25 बळी घेतले आहेत. मात्र, त्याला पाठीची किंचित  दुखापत झाल्याने दक्षता म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या व्यवस्थापनाने परत बोलावले होते. रबाडाबाबत आम्ही दक्ष आहोत, असे वैद्यकीय अधिकारी मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले. त्याचा तीन आठवड्यांचा पुनर्वसन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी त्याला दोन आठवडे लागले आहेत. यामधून सावरत तो दक्षिण आफ्रिच्या संघात निश्चित स्थान पटकावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
दक्षिण आफ्रिकेचे डेल स्टेन आणि लुन्गी एगगिडी हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते कधी तंदुरुस्त होतील हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते वेळेत तंदुरुस्त झाले, तर विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची क्षमता निश्चितच वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.