राजकारणात यायला उशीर; ही माझीच चूक : प्रियांका वढेरा
   दिनांक :13-May-2019
 नवी दिल्ली: राजकारणात प्रवेश करायला मीच थोडा उशीर केला. माझे चुकलेच, असे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव व उत्तरप्रदेशच्या प्रभारी प्रियांका वढेरा यांनी मान्य केले आहे. मी राजकारणात आधीच यायला हवे होते, असेही प्रियांका म्हणाल्या.
माणूस आपल्या चुकांमधूनच शिकतो, मीदेखील चुकले आहे. त्यातून जो अनुभव आला त्याचा उपयोग सध्या करते आहे, असे प्रियांका वढेरा यांनी म्हटले आहे. तसेच मी आता कॉंग्रेसमध्ये सगळ्या जबाबदार्‍या सांभाळण्यास तयार आहे, असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका गांधी यांनी राजकारणात यायला थोडा उशीरच झाला असे मान्य केले.
 
 
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तरप्रदेशात काय होईल, असे विचारले असता प्रियांका वढेरा म्हणाल्या की, आम्ही अनेक जागांवर सक्षम उमेदवार दिले आहेत. आमचे उमेदवारही चांगले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येकाने आपल्यापरिने पूर्ण सामर्थ्यपणाला लावून ही निवडणूक लढली आहे. त्याला साजेसेच निकाल दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार या राज्यांबद्दलही त्यांनी मत मांडले.
आम्हाला या राज्यांमध्ये पक्षाला उभारी आणावी लागेल, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. त्यासाठी चांगल्या आणि योग्य उमेदवारांना, कार्यकर्त्यांना पुढे आणावे लागेल. त्यामुळे काही बदल होतील आणि ते पक्षाला बळकटी आणण्यासाठी असतील असेही प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केले. तसेच या तिन्ही राज्यांमध्ये आम्ही लोकसभा निवडणुकीत चांगला लढा दिला आहे, असेही त्या म्हणाल्या. कॉंग्रेसने आश्वासन दिलेली ‘न्याय’ योजना हा निवडणुकीच्या काळात महत्त्वाचा मुद्दा ठरेल, असे वाटते का? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, नक्कीच ही योजना महत्त्वाची आहे. ती आल्यास शेतकरी आणि गरीब वर्गाला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल.