वडाळी वनपरिक्षेत्राला भीषण आग

    दिनांक :13-May-2019
५०० हेक्टरवरची वनसंपदा जळून खाक
अमरावती: शहराजवळ असलेल्या वडाळी वनपरिक्षेत्र वर्तुळांअतर्गत येणाऱ्या वाघामाई जंगलाला भीषण आग लागली. या आगीत जवळपास ५०० हेक्टर जंगल जळून बेचिराख झाले आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या जावळपास ही आग लागली होती. आग कोणीतरी मुद्दाम लावली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आगीचे लोळ अमरावती-चांदुर रेल्वे मार्गावरून दिसत होते. जंगलात कुठे खोऱ्यात तर कुठे डोंगरावर ही आग लागली असल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. वन परिक्षेत्र अधिकारी कैलाश भूम्बर यांच्या नेतृत्वात जंगलातील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी धावपळ करीत आहे. आगीमुळे जंगलातील बिबटे, हरण, चितळ, नीलगाय या प्राण्यांसह मोर आणि इतर पक्षी लगतच्या पोहरा जंगलात पळाले. सरपटणाऱ्या प्राण्यांची आगीत जीवितहानी झाली आहे.