अप्पर वर्धा धरणाचे पाणी पेटले; काँग्रेस आमदाराची मुख्य अभियंत्यांना शिविगाळ

    दिनांक :13-May-2019
- पाणी सोडण्यासाठी यशोमतींचा आकांततांडव
 
 
तभा ऑनलाईन टीम   
अमरावती,
जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईचे चटके बसत असताना अप्पर वर्धा धरणाचे पाणी तिवसेकरांसाठी नदीपात्रातून सोडण्याच्या मागणीवरून सोमवारी चांगलीच खडाजंगी झाली. आमदार यशोमती यांनी आकांततांडव करून मुख्य अभियंता लांडेकर यांना पालकमंत्री पोटे यांच्या उपस्थितच शिविगाळ केली. त्यामुळे वातावरण चांगले तापले होते. 
 
अप्पर वर्धा धरणातले पाणी सोडण्याची मागणी यशोमती ठाकूर यांच्यासह भाजपाच्या निवेदिता चौधरी व अन्य काही मंडळींनी केली होती. ती मागणी मान्य करून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी रात्री जलसंपदा विभागाकडून पाणी सोडण्यात येणार होते. मात्र, त्यापुर्वीच वरूड-मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने पाणी सोडण्याचे थांबविण्यात आले. मग त्यावरून आरोप सुरू झाले. बोंडे यांनी अधिकार्‍यांवर दबाव आणून निर्णय फिरवला, असा थेट हल्ला करून यशोमती यांनी पाणी न सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला. दरम्यान सोमवारी दूपारी त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी त्यांच्यासमवेत दूष्काळ पाहणी दौर्‍यावर असलेले काँग्रेसचे विजय वेडट्टीवार, रणजीत कांबळे, विरेंद्र जगाताप, बबलू देशमुख व अन्य नेते होते.
 
 
 
मागणीच्या समर्थनात नारेबाजी करून त्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर त्यांना पालकमंत्री पोटे सिंचन भवनात आढावा बैठक घेत असल्याचे माहित झाल्यानंतर ही सर्व मंडळी तेथे धडकली. तेथे पोहचताच यशोमतींनी आक्रमक भुमिका घेऊन मुख्य अभियंता लांडेकर यांच्यावर अतिशय वाईट शब्दामध्ये प्रहार सुरू केले. शिविगाळही केली. आदेश असतानाही कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही पाणी सोडले नाही, याचा जाब विचारत त्यांनी बैठकीचा कक्षच डोक्यावर घेतला. त्यावर पालकमंत्र्यांनी माझे आदेश नव्हते असे सांगून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, रणजीत कांबळे यांनी आचारसंहीता असल्यामुळे तुमच्या आदेशाची गरज नाही. जिल्हाधिकार्‍यांचेच आदेशच महत्वाचे आहे, असे ठासून सांगितले. दरम्यानच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळाचे उपाध्यक्ष आ. सुनील देशमुख बैठकीत पोहचले.
 
याच काळात यशोमती व निवेदिता चौधरी यांच्यातही तु-तु-मै-मै झाली. अखेर पालकमंत्री पोटे यांनी पाणी टंचाई लक्षात घेता प्रकल्पातून आवश्यक ठिकाणी प्राधान्याने पाणी पुरवठा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत, असे सांगून कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानूसार तत्काळ पाणी पुरवठ्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. त्यानुसार दूपारीच अप्पर वर्धाचे दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. तिवसा नगर पंचायतीसोबत 0.20 द.ल.घ.मी. पाण्यासाठी करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार सद्य:स्थिती लक्षात घेऊन तातडीने पुरवठा झाला पाहिजे. या कामात कसूर होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

 
 
यशोमतींच्या नाकर्तेपणामुळे तिवस्यात पाणी टंचाई : आ. बोंडे
यशोमती ठाकूर १० वर्ष आमदार असून सुद्धा तिवसा व मोझरीला अप्पर वर्धा धरणावरुन कायमस्वरुपी पाणी पुरवठा करु शकल्या नाही. तसा प्रस्तावही कधी शासनापुढे मांडला नाही. मोझरी विकास आराखड्यातही पाणी विषय हाताळला नाही. आता तहानलेल्या मोझरी, तिवसाच्या जनतेचा रोष अंगावर येऊ नये म्हणून यशोमतींनी जलसमाधी घेण्याची नौटंकी करीत आहे, असा स्पष्ट आरोप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
 
पाणी सोडताच मोर्शीकरांची धरणावर धडक
सिंचन भवनात दूपारी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार अप्पर वर्धा धरणाच्या दोन दरवाज्यातून दूपारी ४ वाजता पाणी सोडण्यात आल्याची माहिती मोर्शीतल्या भाजपा कार्यकर्त्यांना व नागरिकांना मिळताच त्यांनी धरणावर धडक दिली. नियंत्रण कक्षात ठिय्या आंदोलन सुरू करून दरवाजे बंद करण्याची मागणी लावून धरली त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वृतलिहेस्तोवर आंदोलन सुरूच होते आणि दोन पैकी एक दरवाजा बंद करण्यात आला होता.