विमानतळावर २५ किलो सोनं जप्त
   दिनांक :14-May-2019
तिरुवनंतपूरम,
तिरूवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय प्रवाशाकडून एकूण २५ किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत ८.५ कोटी रुपये असून यापूर्वी या विमानतळावर एवढ्या मोठ्याप्रमाणावर सोनं कधीच जप्त करण्यात आले  नव्हते असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
एक प्रवासी मोठ्या प्रमाणावर सोनं घेऊन येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून महसूल गुप्तचर संचालनालयला (डीआरआय) देण्यात आली होती. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी तिरुवनंतपूरम विमानतळावर सापळा रचला होता. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत असतानाच एका प्रवाश्याच्या सामानात सोन्याची बिस्कीटे सापडली. या सोन्याची एकूण किंमत साडे आठ करोड रूपये इतकी आहे. या प्रवाशाचे नाव सुनील असं असून तो तिरुमलाचा रहिवासी आहे. मस्कतवरून ओमान एअरलाईनच्या डब्ल्यूवाय-२११ या विमानाने ते सकाळी साधारण साडे सात वाजता तिरुवनंतपूरम विमानतळावर पोहोचला होता.
तपासादरम्यान सुनीलजवळ दोन बॅगा सापडल्या. या बॅगेत अॅल्युमिनियम फॉईलची दोन पाकिटे सापडली. ही पाकिटे उघडून पाहिल्यावर त्यात सोन्याची २५ बिस्कीटे सापडली. ही प्रत्येक बिस्कीटं एक किलोची असल्याचे सांगण्यात येते.