अय्यर म्हणजे शिव्या देणार्‍यांचा म्होरक्या

    दिनांक :14-May-2019
भाजपाचा जोरदार पलटवार 

 
 
तभा ऑनलाईन टीम  
नवी दिल्ली,
काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर हे शिविगाळ करणार्‍या टोळक्यांचा म्होरक्या आहेत आणि निर्लज्जपणे आपल्या खालच्या पातळीवरील शिव्यांचे समर्थन करीत असतात, असा जोरदार पलटवार भाजपाने आज मंगळवारी केला.
 
डिसेंबर 2017 मध्येही अय्यर यांनी मोदी यांना अशीच शिविगाळ केली होती आणि नंतर आपली हिंदी कमजोर असल्याचे कारण देत, माफीही मागितली होती. आता ते मोदींना दिलेल्या शिवीचे समर्थन करीत आहेत. काँग्रेसने त्यांना निलंबित केले आणि नंतर निलंबन मागे घेतले. काँग्रेसचा अहंकार आणि मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे, असे टि्‌वट भाजपाचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी केले.
 
 
 
पाकिस्तानप्रेमी असलेले अय्यर मोदी यांना राष्ट्रविरोधी ठरवतात, पण देशाला माहीत आहे की, मोदी हेच खरे देशभक्त आहेत. अय्यर यांनी नेहमीच परिवारभक्ती निभावली आहे. शिविगाळ करणारे सर्वच नेते गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत, ही सत्यता देखील देशाला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
 
 
 
भाजपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनीही अय्यर यांच्यावर हल्ला चढविला. अलीकडेच गांधी घराण्याचे भक्त सॅम पित्रोदा यांनी, शीखसंहारावर ‘झाले ते झाले, मग आता काय’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनीही, आपली हिंदी अतिशय खराब असल्याने ही चूक झाल्याची सावरासावर केली. आता त्यात अय्यर यांनीही भर घातली, असे टि्‌वट मालविय यांनी केले.