पुन्हा भेटू...

    दिनांक :14-May-2019
घुमू संगतीनं
 अमान रेड्डी
 
सकाळी एकदम आरामात उठलो. 10च्या आत खाली नाष्ट्याला जायचे एवढेच करायचे होते. त्यानुसार पावणे दहाला तिथे पोहोचलो. इथेपण सिरिअल्स होते, त्यामुळे बरे होते आणि माझा प्लास्टर मधला पाय पाहून तिथले सेवक मला जागेवर आणून देत होते. अर्थात, अतुल, अक्षय देत होतेच. एकूण चांगली सरबराई चालू होती. नंतर माझी गाडी धुवावी असे ठरले. कारण ती मनालीत धुतली गेली नव्हती. मग माझी आणि अक्षयची गाडी घेऊन निघालो. जाऊन 2 गाड्या धुवेपर्यंत अतुलला त्याचीपण गाडी धुवावी असे वाटू लागले होते. आम्ही 2 गाड्या धूवून मग एका मॉल मधे गेलो. कारण या दोघांना लस्सी प्यायचीच होती. मग एका कटानी नावाच्या हॉटेलमधे दहिवडे वगैरे खाल्ले व लस्सी प्यायलो. अगदीच साधारण होती. मग कोणाशीतरी बोलताना कळले की चंदिगढ मधे काही लस्सी प्रसिद्ध नाही. ती अमृतसरला. तिथे जेऊन हॉटेलवर आलो. 4 वाजता बाईक द्यायला जायचे ठरले होते. त्यामुळे आता दगडांची बाग व सुखना सरोवर बघायला वेळ नव्हता.
 
 
 
झोप काढून सव्वा चारला खाली आलो. निलेश म्हणला होता कोणाला तरी मी परत घेऊन येइन व तुझी गाडी घेऊन जाईन; पण मीच म्हटले, मी चालवू शकेन 4-5 किलोमीटर तर जायचे आहे. हो -नाही करता करता निघालो मीच गाडी चालवत. पोहोचलो व्यवस्थित; पण तिथे कोणीच नव्हते. मग त्यांची माणसे येइपर्यंत आम्ही नेलेले काही कपडे व काही पुठ्ठे यांनी गाड्यांचे दिवे वगैरे बांधले. मग ती लोक आल्यावर पूर्ण बांधाबांध केली. घामाने तर अंघोळ झाली होती पहिल्या 10 मिनिटातच. पण एक बरे झाले. आम्ही आमचे काही सामान, म्हणजे 1, 2 विजारी, एक दोन सदरे, हातापायाचे संरक्षक, असे गाडीलाच बांधून टाकले होते. म्हणजे चरे उठण्यापासून संरक्षण आणि तेवढेच वजन कमी.
 
हेल्मेट अर्थातच गाडीलाच बांधले होते जाता -येताना. तुफान तहान लागली होती त्यामुळे थोडे तुफानी केले. म्हणजे, शीतप्येय आणले होते सगळ्यांसाठी. सटासट संपले ते. मग मी निलेशच्या गाडीवरून हॉटेलला आलो तेंव्हा जवळपास 8 वाजले होते. तब्बल 4 तास मोडले या प्रकरणात. काही लोक सकाळीच नाष्ट्यानंतर गाडी करून दगडी बाग वगैरे बघून आले होते मधल्या वेळात; पण तसेही आम्हाला एवढा काही उत्साह नव्हता त्या उन्हात फिरण्याचा आणि मला जमलेच नसते चालायला त्यामुळे मी गेलोच नसतो. बाकीची मंडळी रीक्षा पकडून आली. आधी अंघोळ केली. मग जेऊन जरा अंगणात गप्पा मारत उभे रहिलो. उद्या घरी परत जाणार, रहाटगाडगे सुरू होणार. निदान अक्षय, अतुलसाठी तरी. मी घरीच असणार होतो; पण ते फक्त अक्षयलाच माहीत होते. मस्त गप्पा मारून झोपलो.
 
सकाळी निवांतपणे नाष्टा केला व टक्सी केली होती. ती आल्यावर निघालो विमानतळावर. तिथे गेलो तर अजून आमच्या विमान कंपनीच्या खिडक्या उघडल्या नसल्याने बाहेरील खुर्चींवर बसावे लागले 15 मिनिटे. मग आत गेलो. अक्षयचे विमान एअर इंडियाचे होते. त्यांनी सामानाच्या वजनाचा घोळ घातला. केबिन आणि चेकिन सामानाचे एकत्रित वजन बरोबर मर्यादेत होते; पण ते खोगीरला केबिन म्हणून घेऊ देत नव्हते. मग शेवटी खोगीरात खोळीतले सामान भरले व खोगीर चेकीन केले. मला व अतुलला मात्र काही त्रास झाला नाही जेट एअरवेज मध्ये. मग दोघांची गेट्स एकच असल्याने एकत्रच जाऊन बसलो, बर्गर खाल्ला, कॉफी प्यायली. वर थोड्यावेळाने अतुलने लस्सीपण प्यायली.
 
हा हा म्हणता विमान वेळेत पोहोचले. अतुल तिथेही काही खरेदी करायला बघत होता. पण फारच महाग असल्याने विचार सोडला. इथे बरीच मंडळी परत भेटली. फोटो काढून झाले. मग बाहेर आलो. अक्षयचे विमान दुसर्‍या टर्मिनलला येणार होते. मग त्याची वाट पहाट बसलो. एक खतरी जोडपे दिसले. पांढरे टी-शर्ट्स घातले होते. आता अक्षय येइपर्यंत अतुलला धीर धरवत नव्हता. मग तो आल्यावर त्याला इकडच्या टर्मिनलला बोलावले. टॅक्सिवाल्यांना विचारले की, एकाला रेल्वे स्टेशनपाशी, मला माझ्या घरी व अतुलला त्याच्या घरी असे सोडणार का? तर प्रत्येक थांबा वेगळा असे म्हणून 800 रुपये सांगितले. मग अर्ध्या तासाने एक युवा चालक होता त्याने आम्हाला 300 रुपयात सोडले. त्याला बिचार्‍याला रोजा सोडायची घाई होती तरी अर्धा पाऊण तास उशीर होऊनही नीट सोडले, जास्त पैसे घेतले नाहीत. घरी आलो तर रंगकाम काढले असल्याने घरात नुसता गोंधळ होता... अखेर ‘घुमू संगतीनं’ म्हणत आमचा हा प्रवास अखेर समाप्त झाला. गेले किती दिवस आम्ही सर्व मित्र एकत्र होत आता पुन्हा एकत्र भटकंती लवकरच होणार, हे निश्चित आणि मग आम्ही घेऊन येणार घुमू संगतीनं चा सेकंड सिझन... मात्र, पहिला सिझन आज इथेच संपतोय!