मोदी सरकारच्या काळात स्टार्टअपच्या संख्येत झपाट्याने वाढ

    दिनांक :14-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
बंगळुरू
देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून स्टार्टअपच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याचे एका अभ्यासावरून समोर आले आहे. फ्लिपकार्ट, ओला, ओयो आणि स्विगी यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत लक्ष वेधून घेतले आहे. २०१४ ते २०१८ या काळात या बिझनेस टू बिझनेस (बी-टू-बी) श्रेणीतील स्टार्टअपची संख्या ९०० वरून ३,२०० झाली आहे.

 
 
एकूण तंत्रज्ञान स्टार्टअपमध्ये बी-टू-बी स्टार्टअपचे प्रमाण २०१४ मध्ये २९ टक्‍के होते. ते २०१८ मध्ये वाढून ४३ टक्‍के झाले. यापैकी किमान पाच स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्न दर्जा प्राप्त झाला आहे. १ अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त मूल्य असलेल्या खाजगी कंपनीला युनिकॉर्न दर्जा मिळतो. असा दर्जा मिळालेल्या कंपन्यांत इनमोबी, फ्रेशवर्क्‍स, उडान, बिलडेक्‍स आणि डेल्हिवरी यांचा समावेश आहे. पाईन लॅब्ज, द्रुव, ग्रेऑरेंज, रिव्हिगो आणि लेंडिंगकार्ट या स्टार्टअप कंपन्यांना लवकरच हा दर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. फंडिंग बी-टू-बी स्टार्टअप कंपन्या ३६४ टक्क्‌यांनी विस्तारल्या आहेत. या कंपन्यांचे मूल्य आता ३.७ अब्ज डॉलरवर गेले आहे.