परीक्षेपासुन वंचित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार

    दिनांक :14-May-2019
-पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा तात्काळ निर्णय

 
 
तभा ऑनलाईन टीम   
भंडारा,
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर अंतर्गत सुरु असलेला शाश्वत पशुधन व्यवस्थापक दुग्धउत्पादन पदविका विद्यालय कोंढा कोसरा येथील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज विद्यापीठात सादर न केल्यामुळे दिनांक २ मे पासून सुरु झालेल्या परिक्षेपासुन वंचित रहावे लागले. विद्यालयाच्या या भोंगळ कारभारा विरोधात विद्यापीठाने शाश्वत वेटरनरी कॉलेज वर कारवाही करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे कुलगुरुंना निवेदन सादर केले होते.
 
शाश्वत वेटरनरी कॉलेजच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऐन परिक्षेचा दिवशी विद्यार्थ्यांना कळले होते की, महाविद्यालयाने विद्यापीठात परीक्षा अर्ज सादर केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासुन वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांनी पासपोर्ट फ़ोटो व परिक्षेला लागणारे दस्तावेज महाविद्यालयात सादर केले होते. परंतु संस्थाध्यक्ष व प्राचार्यांच्या निष्काळजी पणाने आवेदनपत्रच विद्यापीठात सादर केले नाही याविषयी विद्यार्थ्यांनी संस्थाध्यक्ष अरुण मोटघरे यांचे कार्यालय गाठुन त्यांना जाब विचारले असता पाच हजार रुपये परीक्षा शुल्क भरा आणि ऑक्टोबर मध्ये परीक्षा द्या असे उर्मट भाषेत बोलून विद्यार्थ्यांना हाकलुन लावले होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणाऱ्या संस्थाध्यक्ष मोटघरे यांच्यावर फौजदारी कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावे व विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास अभाविपतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
 
 
 
याप्रकरणी अभाविपने आक्रमक भूमिका घेत विद्यापीठात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता तत्काळ परीक्षा घेण्यात यावी ही मागणी लावून धरली व सतत पाठपुरावा केला व यावर विद्यापीठाकडून परिक्षेपासुन वंचित विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. यावर दिनांक 10 मे ला शाश्वत पशुवैद्यकीय विद्यालयाला विद्यापीठाकडून पत्र आले व 11 मे पासून विद्यापीठाचे परीक्षा अर्ज भरणे महाविद्यालयात सुरु झाले आहे व परीक्षा अर्ज भरण्याची 15 मे अंतिम दिनांक आहे.  विद्यापीठाच्या तत्परतेवर अभाविप ने समाधान व्यक्त केले असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या यशावर समाधान व्यक्त केले.